या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या भावना गोठतील, असा प्रकार समोर आला आहे. रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे चक्क लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन एक ८ वर्षांचा चिमुकला रस्त्यावर बसला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मुरैना, मध्य प्रदेश : – देशात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना एक अशी घटना समोर आली ज्याने सगळ्यांनाच धक्का बसेल. शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना इथं एक ८ वर्षांचा मुलगा आपल्या ३ वर्षाच्या लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला होता. तर मुलाचे वडील पूजाराम जाटव हे मृत मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
अंगावर शहारे आणणारी घटना…
रस्त्याच्या कडेला मृतदेहासोबत एक लहान बालक बसलेला पाहून नागरिकांची तुफान गर्दी केली. तातडीने याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. ही घटना मुरैना जिल्ह्यातील अंबा येथील बडफ्रा गावातील आहे. पूजाराम जाटव यांचा दोन वर्षांचा मुलगा राजा याची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला पूजारामने आपल्या मुलाला घरीच बरे करण्याचा प्रयत्न केला. पण, पोटदुखी असह्य झाल्याने त्यांनी मुलाला मुरैना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यांचा मोठा मुलगा गुलशन हाही पूजारामसोबत रुग्णालयात गेला होता.
अखेर मुरैना जिल्हा रुग्णालयात राजाचा मृत्यू झाला. गरीब आणि असहाय पुजारामने रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे मृतदेह परत गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची विनंती केली परंतु त्यांनी वडिलांची मागणी धुडकावून लावली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका नाकारल्याने हा माणूस आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालयाबाहेर आला आणि रस्त्यावर बसला.
‘रुग्णवाहिकेला देण्यासाठी पैसे नाहीत’
पंक्चरचे दुकान चालवणाऱ्या पूजाराम जाटव यांना रुग्णालयातून एकही वाहन मिळालं नाही. दुर्दैवी बाब म्हणजे दुसऱ्या वाहनाने जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी आपला मोठा मुलगा गुलशनला मृतदेहासह हॉस्पिटलच्या बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आणि ते गाडीची व्यवस्था करण्यासाठी गेले.
रस्त्यावर भावाच्या मृतदेहासोबत बसला चिमुकला…
वडिल परत येईपर्यंत गुलशन त्याच्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन रस्त्यावर बसला होता. लोकांनी हे पाहून जेव्हा गर्दी करण्यास सुरुवात केली तेव्हा याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि नंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेची सोय करून मृतदेह गावी पाठवण्याची व्यवस्था केली.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर





