धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे धाव; केली ही महत्वाची मागणी

Spread the love

Shivsena vs Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन देत आहेत, तर काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बाजू घेतली आहे. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शिवसेनेने केली केली आहे.

मुंबई :- शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट दावा सांगू शकतो. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर आता काही खासदारदेखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर काही नगरसेवक आणि कार्यकर्तेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा केलेला आहे. आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केला जाऊ शकतो. असे असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वरील मागणी करणारे कॅव्हेट दाखल केले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवेसनेपासून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेसोबतच राहणार, असा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टीम झुंजार