मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंग्लंड क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेट मालिकेत बरोबरी साधत तिसर्या सामन्यात भारतासमोर भलंमोठ्ठं आव्हान निर्माण केलं होतं. नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आपला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध करत भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांत २५९ धावांवर गुंडाळला नंतर त्यांच्या गोलंदाजांचा समाचार घेत ४२.१ षटकांत २६१/५ असे विजयी लक्ष पार केले. सामन्यासोबतच भारताने एक दिवसीय मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडच्या संघाला महंमद सिराजने डावाच्या दुसर्याच षटकात दोन जबरदस्त दणके दिले. जॉनी बेअरस्ट्रो आणि जो रूट यांना शून्यावर बाद करून त्याने भारतीय गोलंदाजांमध्ये चैतन्य निर्माण केलं. कर्णधार जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनाही हार्दिक पांड्याने एकाच षटकात बाद केले. जोस बटलरने ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ८० चेंडूंत ६० धावा काढल्या. तर लियाम लिव्हिंगस्टोनने २ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३१ चेंडूंत २७ धावा काढल्या. डावाच्या ४६व्या षटकात यझुवेंद्र चहलने क्रेग ओव्हरटन आणि रिस टोपले यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.
त्याने पुढच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी मिळवल्या एक अनोखी हॅटट्रिक होऊ शकते. जेसन रॉयने चांगली सुरूवात केली. त्याचा जम बसतोय असतानाच हार्दिक पांड्याने त्याला ४१ धावांवर बाद केले. बेन स्टोक्सला २७ धावांवर हार्दिक पांड्याने झेलबाद केले. दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावा काढणार्या मोईन अलीला रविंद्र जडेजाने तंबूची वाट दाखवली. डेव्हिड विलेला १८ धावांवर यझुवेंद्र चहलने बाद केले. हार्दिक पांड्याने २४ धावांमध्ये ४, यझुवेंद्र चहलने ६० धावांमध्ये ३, महंमद सिराजने ६६ धावांमध्ये २ तर रवींद्र जडेजाने २१ धावांमध्ये १ गडी बाद केले. भारताच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.
भारताची सलामीची जोडी कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी डावाला सुरूवात केली. शिखर धवनला रिस टोपलेने सामन्याच्या तिसर्याच षटकात तंबूची वाट दाखवली. तर रोहित शर्माला रिस टोपलेने सामन्याच्या पाचव्या षटकात १७ धावांवर बाद केले. विराट कोहलीची आणि धावांची गणितं जुळत नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले. वेस्ट इंडिज दौर्यातून त्याने घेतलेली माघार त्याच्या आणि संघाच्या हिताची ठरेल. आजही त्याला रिस टोपलेने १७ धावांवर बाद केले. भरवशाचा सूर्यकुमार यादवही १६ धावा काढून परतला. त्याला क्रेग ओव्हरटनने बाद केले. भारताची अवस्था ७२/४ अशी झाली. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने डावाला आकार देण्यास सुरवात केली.
बघता दोघांनी अर्धशतकी नंतर शतकी भागीदारी पूर्ण केली. दोघांनी मिळून १३३ धावा भारताच्या खात्यावर जोडल्या आणि विजयासाठी ५५ धावांची गरज असताना हार्दिक पांड्या बाद झाला. त्याने १० चौकारांसह ७१ धावा काढल्या. त्याला ब्रायडन कारसेने बाद केले. १०६ चेंडूंत आपलं शतक पूर्ण करणार्या ऋषभ पंतने पुढच्या २५ धावा काढण्यासाठी केवळ ९ चेंडू घेतले. त्यात त्याने ६ चौकार मारले. त्यापैकी ५ चौकार सलग डेव्हिड विलेच्या गोलंदाजीवर लगावले. एक अजून चौकार त्याच षटकात मारला असता तर त्याच्या नावावर एक विक्रम आणि भारताचा विजय असा दुग्धशर्करायोग जुळून आला असता. पण हरकत नाही, पुढच्याच षटकात जो रूटच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्याने भारताचा सामन्यातला तसेच मालिकेतला विजय थाटात साजरा केला.
ऋषभ पंतने १६ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने नाबाद १२५ धावा काढल्या. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने मिळून ५६ धावांची भागीदारी केली. हे ऋषभ पंतचं एकदिवसीय क्रिकेट मधले पहिलं शतक ठरलं.इंग्लंडने आज ८ गोलंदाज वापरले पण रिस टोपलेने ३५ धावांमध्ये ३, ब्रायडन कारसेने ४५ धावांमध्ये १ तर क्रेग ओव्हरटनने ५४ धावांमध्ये १ गडी बाद केले.
ऋषभ पंतला सामनावीर तर हार्दिक पांड्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्यासाठी जाणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश दौर्यावर आहे. पहिला एकदिवसीय सामना २२ जुलै रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४