रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया.

Spread the love

मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणखी एक धक्का बसला असून रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कोणतीही किंमत राहिली नसल्याची खंत रामदास कदम यांनी पत्रातून जाहीर केली आहे. महत्वाचं म्हणजे बंडखोर आमदारांमध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदमदेखील आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी आता रामदास कदम यांच्याशी बोलणार आहे. आमदार योगेश कदम पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहे याबद्दल सर्वांना माहिती आहे. रामदास कदम यांच्या शुभेच्छा आधीपासूनच आमच्यासोबत होत्या,” असं एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

रामदास कदम यांनी पत्रात काय म्हटलं आहे –

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळालं,” असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली आहे.

“आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले,” असंही रामदास कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

“विधानसभेच्या निवडणुकीआधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की, यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं, तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही,” असंही रामदास कदम या पत्रात म्हणतात.

“मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक्ष शिवसैनिक याचा साक्षीदार आहे,” असं कदम यांनी आपलं शिवसेनेसोबत असणारं नातं सांगताना म्हटलं आहे.

“२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार