एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल :- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य यंत्रणा,पोलीस,महसूल प्रशासन,नगर पालिका यासह सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहून कोरोनाचा फैलाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत केली.कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसंदर्भात तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेल्या उपाययोजना,कोरोनाची स्थिती,उपचारासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री याबाबत माहिती घेण्यात आली.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा,राजकीय व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे कोरोनाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे सांगितले.कोरोआनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही,त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करून दक्ष राहावे असे आवाहन केले.कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्याची सुचना त्यांनी केली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून तालुक्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला त्याची क्षमता संपूर्ण तालुक्याला ऑक्सिजन पुरेल इतकी असल्याची माहिती दिली.ग्रामीण रुग्णालयाबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढल्या असून रुग्णाच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याची सुचना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील याना केली.कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.पोलीस,पालिका कर्मचारी यांनी संयुक्तपणे मास्कचा वापर न करणा-या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले.तालुक्यातील १ लाख ८३ हजार नागरिकांपैकी १ लाख २ हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर ५७ हजार नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच सुमारे वीस टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.शासकीय कार्यालयांमध्ये येणा-या नागरिकांनी मास्कचा वापर केला नसेल तर त्यास कार्यालयात प्रवेश देऊ नये अशी सुचना केली.तसेच सर्व शासकीय कर्मचा-यांनी मास्क्चा वापर करावा असे आवाहन केले.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती दिली.ग्रामीण रुग्णालय,कासोदा,रिंगणगाव,तळई येथील उपकेंद्रातही सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्याचे सांगितले.सर्व शाळा,महाविद्यालय याठिकाणी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.बैठकीस तहसीलदार सुचिता चव्हाण,पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे,ग्रामीण रुगणलायाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख,डॉ.मिल्लत शेख,डॉ.धीरज मराठे,गटविकास अधिकारी बी.एस.अकलाडे,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,आरोग्य गटविकास अधिकारी शिवाजी गंनगने रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संजय चौधरी यांचेसह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.