भारताचा वेस्ट इंडिजवर ६८ धावांनी विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी घौडदौड सुरू झाली असतानाच आजपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू झाली. नियमित कर्णधार रोहित शर्मा पुन्हा संघात दाखल झाल्यामुळे तंबूत आनंदाचं वातावरण आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी डावाची दमदार सुरूवात केली. पण अकील हुसेनने डावाच्या ५व्या षटकांत सुर्यकुमार यादवला २४ धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात श्रेयस अय्यरला ओबेद मॅकोयने शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय संघाची ६ षटकांत ४५/२ अशी अवस्था झाली. अचानक दोन गडी बाद झाल्यामुळे दोन्ही फलंदाजांवर अतिरिक्त दबाव आला.

त्यामुळे धावांचा ओघही आटला. १०व्या षटकात किमो पॉलने ऋषभ पंतला १४ धावांवर बाद करत भारतीय फलंदाजीला सुरूंग लावला. एक बाजू कौशल्याने लढवत असलेल्या रोहित शर्माने वैयक्तिक अर्धशतक आणि संघाचं शतक धावफलकावर झळकावलं. पण हा आनंद फार काळ टिकण्यापूर्वीच अल्झारी जोसेफने केवळ एका धावेवर हार्दिक पांड्याला बाद केलं. १५व्या षटकात जेसन होल्डरने रोहितला ६४ धावांवर बाद केला. भारताचा निम्मा संघ १३१ धावांवर परतला होता.

पुढच्याच षटकात अल्झारी जोसेफने जडेजाला १६ माघारी धाडले. १८व्या षटकात भारताने १५० धावांचा टप्पा ओलांडला. १९ आणि २०व्या दिनेश कार्तिक आणि आश्विनने मिळून ३६ धावा जोडल्या. त्यामुळे भारत १९०/६ अशी धावसंख्या झळकावू शकला. ह्यांच्या निर्णयक अर्धशतकी भागीदारीमुळे भारत चांगलं आव्हान उभं करू शकला. दिनेश कार्तिकने चार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने केवळ १९ चेंडूंत नाबाद ४१ धावा काढल्या. तर आश्विनने नाबाद १३ धावा काढल्या.

वेस्ट इंडिजच्या डावाची सुरूवात शारमाह ब्रुक्स आणि काईल मेयर्स यांनी केली. अर्शदीप सिंगने डावाच्या दुसर्‍याच षटकात काईल मेयर्सला १५ धावांवर बाद केले. तर जडेजाने पुढच्याच षटकात जेसन होल्डरला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. ६व्या षटकात भुवनेश्वर कुमारने शारमाह ब्रुक्सचा २० धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. ९ व्या षटकात आश्विनने निकेलस पुरनचा अडसर दूर केला. रवी बिष्णोईने रावमन पॉवेलचा १४ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. आश्विनने शॅमरॉन हेटमायरला १४ धावांवर बाद केले. ओडियन स्मिथला रवी बिष्णोईने आल्या पावली परत पाठवले आणि वेस्ट इंडिज संघ ८६/७ अशा दयनीय अवस्थेत पोहचला. १६व्या षटकात वेस्ट इंडिज संघाच्या १०० धावा पूर्ण झाल्या. विजयी लक्ष्य त्यांच्या आवाक्याच्या बाहेर कधीच गेले होते.

त्यातच अर्शदीप सिंगने अकील हुसेनला ११ धावांवर बाद केले. २०व्या षटकाअखेर वेस्ट इंडिजने १२२/८ धावा जमा केल्या आणि भारताने हा सामना ६८ धावांनी जिंकला. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज फलंदाजांना खेळपट्टीवर ठाण मांडू दिलं नाही त्यामुळे हा विजय सहज शक्य झाला.
दिनेश कार्तिकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने १९ चेंडूंत नाबाद ४१ धावा काढल्या होत्या. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला दुसरा सामना १ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार