पांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड

Spread the love

कल्याण :- काळा कोट आणि पांढरा शर्ट परिधान करून प्रवाशांची तिकीट तपासणी करणाऱ्या दोन बोगस टीसींचा भंडाफोड करण्यात आला आहे. संबंधित आरोपी रेल्वे स्टेशन परिसरात वावरत होते. त्यांच्या हावभाव पाहून रेल्वेतील अधिकृत टीसी आणि त्यांच्या सहकऱ्यांना संशय आल्यानंतर हा भंडाफोड झाला आहे. दोन्ही बोगस टीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

रोहिदास गायकवाड आणि संदीप पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. दोन्ही आरोपी शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ वरील प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळी रेल्वे टीसी संतोष त्रिपाठी आणि विष्णू सांबरे यांनी या दोघांना हटकले असता दोघांनी बनावट ओळखपत्र दाखवले. तसेच आपण रेल्वे विभागातील टीसी व सरकारी नोकर असल्याची बतावणी करू लागले.

तथापि, त्यांच्या बोलण्यावरून अधिकृत टीसील आरोपींवर संशय आला. त्यांनी तातडीने ही बाब रेल्वे प्रशासनाला कळवली. घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

दोन पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे रेल्वेचे दोन बनावट ओळखपत्र व दोन मोबाईल फोन आढळले आहेत. याबाबत अधिक विचारणा केली असता ते दोघेही पोलिसांना अद्याप आपण खरे टीसी असल्याचं सांगत आहेत. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले असून त्यांना टीसीचे ओळखपत्र कोणी दिले? याचा शोध घेतला जात आहे. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार