मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी एका मुख्य आरोपीसह दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अशोक शंकर खरात आणि किसन पुरुषोत्तम सोलंकी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही भांडुपचे रहिवासी आहेत. अशोक हा या कटातील मुख्य आरोपी असून शिवसेनेच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून यापूर्वी त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याचे बोलले जाते.
राजकीय वादातून हा हल्ला झाला असला तरी स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी अशोकने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी सायंकाळी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून आता त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. संदीप देशपांडे शनिवारी सकाळी शिवाजी पार्क मैदानात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना
चार जणांच्या एका टोळीने त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटसह स्टॅम्पने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक औषधोपचारानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयातून सोडून देण्यात आले होते. या हल्ल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी संदीप देशपांडे यांची जबानी नोंदवून घेऊन पळून गेलेल्या चारही मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुमारे अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर पोलिसांनी भांडुप येथून अशोक खरातसह किसन सोलंकी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. या संपूर्ण कटात ठाकरे कुटुंबीयांसह वरुण सरदेसाई यांचा सहभाग नव्हता, असे आतापर्यंत झालेल्या चौकशीतून उघडकीस आले आहे. मात्र तपासात येणाऱ्या प्रत्येक माहितीची शहानिशा होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.
हे देखील वाचा
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.