मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पुरस्कृत एसटी कामगार संघटनेच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेची जादू कायम असल्याचे दिसून आले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेवर आपली सत्ता आणण्यासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून एसटी आंदोलनात उडी घेणारे सदावर्ते पहिल्यांदाच कुठल्यातरी निवडणुकीला सामोरे जात होते. अशात एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेची निवडणूक त्यांच्याकडून लढवण्यात आली. या निवडणुकीत सदावर्ते पॅनलला दणदणीत १९ जागांवर विजय मिळाला. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पॅनलचे १५० हून अधिक उमेदवार आपले नशीब अजमावत होते. निवडणुकीत उतरलेल्या एसटीतील सर्वच संघटनांकडून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र, खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये बघायला मिळाली. सोबतच एसटी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष संघटना देखील ह्या निवडणुकीत आपले नशीब अजमावत होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश मिळाले.
या निवडणुकीत १९ संचालक पदासाठी ६५ हजार मतदारांपैकी सुमारे ८५ टक्के म्हणजेच ५८ हजार मतदारानी मतदानाचा हक्क बजावला होता. २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था मुंबई शहरचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांच्या नेतृत्वात मतमोजणी पार पडली. मतमोजणी रविवारी (२५ जून) सकाळी ९ वाजता सुरू झाली होती. त्यानंतर सोमवारी (२६ जून) सायंकाळी ५ वाजता निवडणूकीचे अंतीम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषीत केले आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या पाच प्रवर्गातील १९ संचालकांसाठी ही निवडणूक पार पडली आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये १४, महिला प्रतिनीधी म्हणून २, अनुसूचित जाती / जमाती प्रतिनीधी १, इतर मागास प्रतिनीधी १, भटक्या विमुक्त जाती / जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनीधी १ असे एकूण १९ संचालक पदी सदावर्ते पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.
एसटी महामंडळात प्रस्थापित असलेल्या आणि गेल्या अनेक दशकांपासून काम करणाऱ्या सर्व कामगार संघटनांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, तिसऱ्या क्रमांकावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची सेवा शक्ती संघर्ष संघटना तर चौथ्या क्रमांकावर एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), पाचव्या क्रमांकावर शिवसेना (उबाठा) – भाई जगताप यांची काँग्रेस – कास्ट्राईब यांच्या युतीचे पॅनल, सहाव्या क्रमांकावर अपक्षांचे पॅनल आणि सातव्या क्रमांकावर बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेला समाधान मानावे लागले आहे.
कोविड आणि संपाच्या संकटातून पुर्णपणे बाहेर न पडलेल्या एसटी महामंडळाने नुकतेच ७५ वर्षे पुर्ण केले. एसटी महामंडळाच्या या प्रवासात एसटी कामगारांसाठी आजपर्यंत २२ विविध संघटना अस्तित्वात आल्या. कामगारांसाठीचे न्याय हक्काचे लढेही या संघटनांनी दिले. मात्र काल, परवा अस्तित्वात आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणूकीत या प्रस्थापित संघटनाना धोबीपछाड दिली आहे. त्यामुळे एसटी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्वच संघटनावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
७० वर्षाची पंरपरा असलेल्या या बँकेवर पांरपारीक पध्दतीने इंटक आणि कामगार संघटनेची सत्ता राहीली आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच निवडणूकीच्या आखाड्यात उतरलेल्या केवळ वर्षभरापुर्वी स्थापन केलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने नवा इतिहास घडवत प्रस्थापित एसटी संघटनाना धूळ चारली आहे. त्यामुळे एसटीचा संप चिघळवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कामगारांमधील लोकप्रियता अजून ओसरली नसल्याचे स्पष्ट होते.
गेल्या अनेक वर्षापासून एसटी कामगारांच्या महागाई भत्ता, पगार वाढीपासून अनेक प्रश्न प्रलंबित होते. मात्र ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात प्रस्थापीत कामगार संघटनांचे नेतृत्व अपयशी ठरले. कामगारांच्या प्रश्नावर व्यापक आंदोलनही झाले नाही. याचा फायदा सदावर्ते, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नव्याने स्थापन झालेल्या संघटनांनी घेतला. सातवा वेतन आयोग आणि एसटी विलिनिकरणाच्या मुद्यावरुन पाच महिने संप पुकारलेला संप यशस्वी झाला नाही, मात्र कामगारांच्या प्रश्नावर आम्ही लढत असल्याचे ठसवून देण्यात गुणरत्न सदावर्ते यशस्वी झाले. त्यामुळे कामगारांनी बँकेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलला एकतर्फी विजय मिळवून दिल्याचे विश्लेषक सांगतात.
एसटी बँकेच्या निवडणूकीच्या अंतीम निकाल घोषीत करतांना उमेदवारांचे प्रमाणपत्र स्वीकारताना अॅड. जयश्री पाटील आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या उमेदवारांकडून नथुराम गोडसेचा जयघोष करण्यात आला. तर दुसरीकडे विजयानंतर काढण्यात आलेल्या विजयी रॅलीमध्ये सुद्धा गोडसेंचे पोस्टर झळकवण्यात आले. यात निवडणूक अधिकाऱ्यांपुढेच त्यांच्या मंचावरून अशी घोषणाबाजी केल्याने निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग झाला का ? या दिशेने निवडणूक निर्णय अधिकारी यावर चौकशी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा कष्टकरी विरूद्ध सावकारी लढा होता. हा वैचारीक लढा याअर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चर्चा व्हावी यासाठी होती. अखंड भारताच्या विचारातून या निवडणुकीची चर्चा व्हावी, ही निवडणूक सामान्य कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी होती. शरद पवारांच्या काळात ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक यांच्या हातात कधीच सत्ता नव्हती. भाकरी फिरवा फिरवी करायची नसते, भाकरी खायची असते. आम्ही भाकरी फिरवत नाही आम्ही झणझणीत फोडणी देतो. त्यामुळे पवारांच्या कामगार संघंटनेचा पराभव करून आम्ही विजय मिळवला आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते (एसटी कष्टकरी जनसंघ) यांनी दिली.
सध्या संविधान न मानणाऱ्यांसाठी कुठलेच नियम अस्तित्वात नाहीत. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्यांची, नथुराम गोडसेचा जयजकार करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. तसेही मुर्खासाठी आणि लोकशाही न मानणाऱ्यांसाठी नियम नसतात. त्यामुळे असली विधाने करणारी व्यक्ती विशिष्ट विचारधारेची असेल तर पोलिस गप्प बसतात, असे सूचक विधान अॅड. असीम सरोदे यांनी केले.
कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णयासोबतच त्यांची असंख्य कामे केलेली आहेत. आमच्या प्रामाणिक प्रयत्नातून त्यांचे समाधान झालेले निकालातून दिसून येत नाही. जय पराजय हा निवडणूकीचा भाग असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात बळ मिळणे ही शोकांतिका आहे. जुमलेबाज आणि फसव्या लोकांना मिळालेला विजय भविष्यात कामगारांना घातक ठरू नये, हीच अपेक्षा असल्याचे हिरेन रेडकर, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कामगार सेना यांनी निकालानंतर सांगितले.
आतापर्यत अॅड. गुणरत्न सदावर्ते हे प्रस्थापीत कामगार संघटनांच्या नावाने अपयशाचे खापर फोडतो होते. मात्र आता त्यांचे पॅनल जिंकल्याने त्यांना बँक योग्य पद्घतीने चालवून दाखवावी लागेल. त्यामुळे सदावर्ते यांची आता खरी कसोटी लागणार आहे.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४