पुणे : – पोलीस दलातून एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. अमरावती येथे सहायक पोलीस आयुक्त असलेल्या पोलीस अधिकार्याने आपली पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला . त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत गायकवाड असे या सहायक पोलीस आयुक्तांचे नाव आहे.मोनी भारत गायकवाड (वय 44) आणि दीपक गायकवाड (वय 35) अशी खून केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे सध्या अमरवती येथे राजापेठ येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी ते पुण्यात सुट्टीवर आले.त्यांचे कुटुंबीय पुण्यात बालेवाडी येथील लक्ष्मणनगरात वास्तव्याला आहेत.
घरी त्यांची पत्नी, पुतण्या, आई, दोन मुले असा परिवार एकत्र राहतो. गेले आठ दिवस ते पुण्यातच होते. त्यांच्या एका मुलाचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला असून दुसराही त्याच क्षेत्रामध्ये आहे. सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांच्या बेडरुममधून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने बाहेर झोपलेले
पुतणे दीपक व गायकवाड यांचा मुलगा उठला.
गायकवाड यांचे बेडरुम आतून बंद होते. दरवाजा ठोठावला तरी त्यांनी तो न उघडल्याने शेवटी पुतण्या आणि मुलाने दुसर्या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा एसीपी गायकवाड यांच्या हातात पिस्तुल पाहून दीपक याने ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात गोळी फायर होऊन ती दीपक यांना लागली. त्यानंतर ते स्वत:वर गोळी घालून घेत होते. हे पाहून त्यांचा मुलाने त्यांना असे काही न करण्याविषयी विनवणी केली. परंतु, त्यांनी तू बाहेर निघ, नाही तर तुलाही गोळी घालेल, असे म्हणून त्याला बाहेर ढकलून दरवाजा बंद केला व स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेची माहिती मुलाने पोलिसांना कळविली. पाठोपाठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तोपर्यंत तिघांचाही मृत्यु झाला होता. गायकवाड यांनी नेमके कोणत्या कारणामुळे हे कृत्य केले हे अद्याप समोर आलेले नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






