जळगाव : गोळीबार करणा-या तरुणास त्याच्या ताब्यातील गावठी कट्ट्यासह अर्धा तासात गजाआड करण्यात एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. स्वप्निल उर्फ सोपान चंदुसिंग मोरे असे गजानन पार्क कुसुंबा येथील रहिवासी असलेल्या व अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश प्रेम तंवर आणि संतोष कोळी हे दोघे मित्र आहेत. संतोष कोळी याने स्वप्नील मोरे यास काही दिवसांपुर्वी मारहाण केली होती.
तो राग मनात ठेवत स्वप्निल मोरे याने त्याच्या ताब्यातील गावठी कट्ट्याने दोन वेळा फायर करत आकाश तंवर यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला होता. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात आवाज झाला आणि खळबळ माजली होती. या गोळीबारानंतर फायरिंग करणारा स्वप्निल मोरे हा त्याचे मित्र अजय पाटील आणि विपुल पाटील या दोघांसह मोटार सायकलने पळून गेला होता. आकाश तंवर याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती गोळीबार करणारा स्वप्नील मोरे हा जळगाव नजीक मन्यारखेडा येथे असल्याची माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील पोउनी दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना. सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुदतसर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील,साईनाथ मुंढे, महीला पो. ना. निलोफर सैय्यद आदींनी स्वप्निल मोरे यास मन्यारखेडा फाटा येथून शिताफीने ताब्यात घेतले.
त्याच्या कब्जातील गुन्ह्यात वापरलेले विस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. अटकेतील स्वप्निल मोरे यास न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्हयाचा तपास पोउनी दिपक जगदाळे आणि योगेश बारी हे करत आहेत. अवघ्या अर्ध्या तासात या गुन्ह्यातील फायरिंग करणा-या स्वप्निल मोरे यास जेरबंद केल्यामुळे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४