महामार्गावर गाडी अडवून दरोड्याचा प्रयत्न; चालकाच्या हुशारीमुळे वाचला जीव,घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चौघांना अटक.

Spread the love

कोईम्बतूर (तामिळनाडू) :- येथे महामार्गावर दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. कोईम्बतूर जिल्हा पोलिसांनी रविवारी पहाटे सालेम-कोची महामार्गावर केरळकडे जाणाऱ्या व्यक्तीची कार अडवून शस्त्रांनी हल्ला करणाऱ्या टोळीतील चौघांना अटक केली.या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी गाडीतून आले होते आणि त्यांनी पीडित व्यक्तीची गाडी अडवून लूटण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानाने प्रसंगावधान दाखवत गाडी तिथून पुढे नेली आणि पोलिसांना याची माहिती दिली. सालेम-कोची महामार्गावर आरोपी असलम सिद्दीकी यांच्या वाहनाचा पाठलाग करत होते.

केरळकडे जाणाऱ्या महामार्गावर आरोपींनी सिद्दीकी यांच्या गाडीला थांबवून घेराव घातला. सिद्दीकी यांच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार रेकॉर्ड झाला. सिद्दीकी यांची गाडी थांबल्यानंतर आरोपी खाली उतरले आणि त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्धीकी यांनी लगेच गाडी मागे घेतली. त्यानंतरही आरोपी त्यांच्या गाडीचा पाठलाग करु लागले. त्यानंतर कशाचीही पर्वा न करता आणि धाडस दाखवत सिद्दीकी यांनी त्यांची गाडी पुढे नेली आणि आरोपीच्या कारच्या दरवाजाला धडक देऊन पळ काढला.आरोपींनी मडुकराईजवळील टोलनाक्याजवळ येईपर्यंत अस्लम सिद्दीकींच्या गाडीचा पाठलाग केला. टोलनाका ओलांडल्यानंतर अस्लम आणि त्यांच्या मित्रांनी महामार्ग पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला.

आरोपींना लूट करता न आल्याने सिद्दीकी आणि त्यांचे मित्र वाचले. मात्र या पकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणात कुन्नाथुनाडू पोलिसांनी मोठा हलगर्जीपणा केल्याची बाब समोर आली. या घटनेनंतर सिद्दीकी हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी केवळ त्यांचे नाव आणि पत्ता लिहून त्यांना परत पाठवलं होतं. मात्र त्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली.”आम्ही दहाहून अधिक हल्लेखोरांपासून बचावलो. आरोपी तीन कारमधून आले होते. दरोडेखोरांची संपूर्ण फौज मास्कच्या मागे लपलेली होती. आमची गाडी थांबवणारा ड्रायव्हर वगळता सर्वांचे चेहरे झाकलेले होते.

शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास एल अँड टी टोल प्लाझाच्या अर्धा किलोमीटर आधी अंतरावर या टोळीने आमचा रस्ता अडवला. त्यानंतर चौघांनी खाली उतरुन त्यांनी आमच्या कारला घेरलं आणि गाडीची विंडशील्ड तोडण्यास सुरुवात केली. मात्र मी गाडी मागे घेतली आणि पुन्हा पुढे पळवली. पण ती आमचा पाठलाग करतच होती. गाडी टोलनाक्यावर पोहोचताच अंधाराचा फायदा घेत आरोपींनी कार पुन्हा महामार्गाच्या मध्यभागी अंधारात थांबवली आणि स्टीलच्या रॉडने कारचे विंडशील्ड तोडण्यास सुरुवात केली,” अशी माहिती अस्लम सिद्दीकींने दिली.

दरम्यान, रविवारी कोईम्बतूर जिल्हा पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली. शिवदास (२९), रमेश बाबू (२७), विष्णू (२८) आणि अजय कुमार (२४) अशी त्यांची नावे आहेत. शिवदास आणि अजय कुमार हे दोघे एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करत होते आणि विष्णू हा भारतीय लष्कराचा शिपाई असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या एप्रिलमध्ये ड्युटीवरून आपल्या गावी परतलेला विष्णू कामावर परतला नव्हता. कोईम्बतूर पोलिसांनी चारही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले आणि तुरुंगात पाठवले.

हे पण वाचा

टीम झुंजार