नंदुरबार – तालुक्यातील रनाळा येथे नाल्याच्या पाण्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.रनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी दगा धात्रक यांची दोघे मुले म्हशी चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होते. दोघे जण नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. धात्रक यांच्या रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा बंधारा आहे. त्यालगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या.
बराच वेळ उलटूनदेखील काही केल्या म्हशी बाहेर येईना. यामुळे विकी (२२) हा म्हशींना बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याचे त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर (२५) याच्या लक्षात आल्याने तो भावाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दोघे जण पाण्यात बुडाले. सदरची बाब काठावर बसलेल्या तिघा लहान मुलींच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना माहिती दिली.
त्यानंतर लगेचच लगतच्या शेतातील शेतकरी व मजूर मदतीसाठी धावले. परंतु, तोपर्यंत दोघे जण पाण्यात बुडाले होते. परिसरातील काहींनी पाण्यात उड्या घेत त्यांचा शोध घेतला. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.ज्ञानेश्वरचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला असल्याचे समजते. दरम्यान, दोघांचे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






