कानपूर :- तरुण दिसण्यासाठी अनेक जण योगासनं, व्यायाम, डाएट या गोष्टी करतात. तसंच खूप जण स्किन केअर रूटीन, हेअर केअर रूटीन फॉलो करतात. वाढतं वय लपवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही.अशाच व्यक्तींचा एका जोडप्याने गैरफायदा घेतला. वृद्धांना तरुण करण्याचा दावा करून त्यांनी टाइम मशीन लाँच केल्याचं सांगितलं. हे मशीन इस्रायलमधून आणल्याचा दावा त्यांनी केला आणि कित्येकांची फसवणूक केली.
कानपूरमध्ये राहणाऱ्या रश्मी दुबे आणि राजीव दुबे नावाच्या जोडप्याने या मशीनचा खूप प्रचार केला. आयपीएस, आयएएस अधिकारी आणि राजकीय नेते या मशीनच्या उद्घाटनाला आले होते. या मशीनची सेवा घेऊन तरुण होण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक समावेश वयोवृद्धांचा होता. त्यांना तरुण व्हायचं होतं; मात्र दुबे दाम्पत्याने या व्यक्तींकडून थेरपीच्या नावाखाली पैसे लुटले आणि त्यांना तरुण बनवायचं स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपये घेऊन ते पसार झाले.
कानपूरच्या गोविंद नगर भागात एका टाइम मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. या मशीनच्या माध्यमातून वृद्धांना एक खास ऑक्सिजन थेरपीद्वारे तरुण करण्यात येईल असा दावा करण्यात आला. ही थेरपी महाग असून त्याचं शुल्क हजारो रुपये असल्याचं सांगण्यात आलं. या दाव्यांवर विश्वास ठेवून अनेक जण थेरपी करून घेण्यासाठी गेले;मात्र तरुण होण्याची हौस असलेले हे सगळे जण हा सगळा फसवणुकीचा प्रकार आहे हे समजू शकले नाहीत.
या टाइम मशीनच्या आमिषाला बळी पडलेल्या पीडित रेनू चंदेलने सांगितलं, की तीदेखील या थेरपीच्या आमिषाला भुलली. तिने अनेकांना ही थेरपी घेण्यास सांगितलं. हे नवरा-बायको तिच्याजवळचे लाखो रुपये घेऊन पळून गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; मात्र अद्याप कोणालाही अटक केली नाही.
कानपूरमध्ये बनवलं होतं मशीन
या पती-पत्नीने जी मशीन इस्रायलमधून आणली आहे, असं भासवून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली ते मशीन या दोघांनी कानपूरच्या ग्रामीण भागातल्या लोखंडी वस्तू बनवणाऱ्या एका खासगी कंपनीकडून तयार करून घेतलं होतं. हे मशीन अर्थातच बनावट होतं.
आरोपींचा शोध सुरू
डीसीपी साउथ अंकिता शर्मा यांनी सर्व पीडितांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपी जोडप्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे; मात्र फरार आरोपींबाबत अजून काहीच माहिती कळू शकलेली नाही. हे दोघे परदेशात पळून गेले आहेत, अशी चर्चादेखील होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी रेड कॉर्नर नोटीस जारी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.