बंगळुरू :- एका पोलिस शिपायाने पत्नी आणि सासऱ्याच्या धमक्यांना कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव एचसी थिपन्ना असे आहे. त्यांचे वय 34 वर्षे होते. थिपन्ना हे वाहतूक पोलिसात कार्यरत होते.पोलिस शिपाई असलेल्या एचसी थिपन्ना यांनी हीलाालिगे रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. त्याच ठिकाणी सकाळी रेल्वे पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडला. त्यावेळी त्यांच्या मृतदेहा जवळ त्यांची सुसाईड नोट मिळाली. त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पत्नी आणि सासऱ्यांवर मोठे आरोप केले आहेत. आपल्या मृत्यूस पत्नी आणि सासरा कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.सुसाईड नोटमध्ये थिपन्ना यांनी आपला सासरच्या लोकांकडून छळ होत होता. वारंवार त्रास दिला जात होता. मानसिक त्रासातून आपण जात होतो. शिवाय ते आपण सहन ही करत होतो. मात्र आता सहन होण्या पलिकडे गेले होते. त्यामुळेच आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्याच बरोबर पत्नी आणि सासाऱ्याने आपल्या जीविताला धोका निर्माण केला होता. त्यामुळे ते आपले काही तरी बरे वाईट करतील ही आपल्याला खात्री होती असे ते म्हणाले आहेत. याच सुसाईड नोटमध्ये त्यांनी पुढे लिहीले आहे की 12 डिसेंबर रोडी सासरे यमुनप्पा यांनी फोन केला होता. हा फोन संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आल्याचं त्यांनी लिहीलं आहे. त्यावेळी सासऱ्यां बरोबर जवळपास 14 मिनिटे बोलणं झालं. या 14 मिनिटात ते आपल्याला केवळ धमकावत होते. त्यानंतरही मी त्यांना भेटण्यासाठीही गेलो होतो. त्यावेळी त्यांनी तू मर असं मला सांगितलं. शिवाय तू मेला तरी माझी मुलगी आनंदी राहू शकते असं सुनावलं. शिवाय आपल्या बरोबर गैरवर्तनही केलं.दरम्यान सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्येच एका इंजिनिअर तरूणाने पत्नी आणि सासरच्या लोकांना कंटाळून आत्महत्या केली होती. अतुल सुभाष असं या इंजिनिअरचं नाव होतं.त्याने मृत्यू पूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात त्यांनी आपण आत्महत्या का करत आहोत याचे धक्कादायक खुलासे केले होते. हे प्रकरण ताजे असताना, पत्नीच्या त्रासाला कंटाळून अजून एकाने आत्महत्या केली आहे.