गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडुन 31 लाख लंपास करुन चोरटे फरार.

Spread the love

बोदवड :- सध्या महाराष्ट्रात एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच बोदवड येथे नाडगाव रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 31 लाख 10 हजार रुपये लांबवले. या खळबळजनक घटनेत तीन जणांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. रविवारी (दि.24) पहाटे 4 ते 4.15 वाजेदरम्यान ही चोरी झाली. मात्र ती सोमवारी सकाळी उघडकीस आली. शनिवार व रविवार बँकेला सुटी होती. ही संधी साधून चोरट्यांनी हा गुन्हा केला. त्यांनी रविवारी पहाटे सर्वात आधी एटीएम रुमच्या बंद असलेल्या शटरचे कुलूप तोडले. यानंतर तिघांपैकी दोघांनी आत प्रवेश करत गॅस कटरने एटीएम फोडले. एक जण बाहेर लक्ष ठेऊन होता.

रक्कम घेऊन पोबारा

यानंतर, अवघ्या काही मिनिटात एटीएममध्ये असलेली 31 लाख 10 हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. सोमवारी (दि.25) सकाळी पावणे नऊ वाजता बँकेचे सहव्यवस्थापक पंकज तडवी हे कार्यालयात आले. मात्र, बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएमच्या शटरचे लॉक तुटलेले दिसले. यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या व खुनाच्या घटना घडतच आहेत. चोरट्यांनी आता एटीएम लक्ष केले आहे. त्यामुळे पोलिस दलासमोर आव्हान झाले आहे.

गुन्हा दाखल

चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्यात संशयितांचा शोध घेत आहे. याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक जयेश गंगवाल यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलिस निरीक्षक अकुंश जाधव करत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार