नोटा मोजण्यासाठी पाच बँकांंच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे..
अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका घरावर ED चा छापा, कोट्यावधींची रोकड जप्त
पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळासंबधी सक्तवसुली संचालनालय (E.D) ने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये २० कोटी रुपये रोकड, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, संपत्तीसंदर्भातील करारपत्रे यासारख्या गोष्टी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ताब्यात घेतल्यात. कोलकात्याजवळच्या बेलघराई शहरातील घरावर केलेल्या छापेमारीमध्ये ही संपत्ती ईडीने जप्त केलीय. मागील आठवड्यामध्येच अर्पिता यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावरील छापेमारीमध्ये २० कोटी रोकड सापडली होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम किती आहे याचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या. कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आलेल्या. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरामध्ये साडलेल्या सोन्याच्या विटांची किंमत ही दोन कोटींहून अधिक आहे. तपासामध्ये अधिक संपत्ती सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसएससी घोटाळा झाला तेव्हा सध्या ईडीने अटक केलेले मंत्री पार्थ चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावर शुक्रवारी ईडीने धाड टाकली तेव्हा त्यांना ५०० आणि दोन हजाराच्या नोटांचा ढीग सापडला. ही रक्कम २० कोटी रुपये इतकी होती.
अशाच प्रकारची छापेमारी बुधवारी अर्पिता यांच्या अन्य एका घरी करण्यात आली असताना तिथेही असाच प्रकार आढळून आला. फक्त या छापेमारीमध्ये रोख रक्कमेबरोबरच सोनं आणि संपत्तीचे कागदपत्रंही आढळून आली. या नव्या छापेमारीनंतर भाजपाचे बंगालचे अध्यक्ष सुखांता मुजूमदार यांनी ट्विटरवरुन तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना, “हे केवळ हिमनगाचं टोक आहे,” असं म्हटलंय.

रात्री सुरु झालेली ही छापेमारी सकाळी सव्वासातच्या सुमारास संपली आणि ईडीचे अधिकारी घराबाहेर पडले. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीमध्ये एकूण २९ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली असून अर्पिता यांच्या घरांमधून जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य हे ४० कोटींहून अधिक आहे.
ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सध्या पार्थ चटर्जी उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतरही ते राजीनामा देण्यास तयार नाहीत. या प्रकरणावरुन आता भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत असून ममता बॅनर्जी यांच्यासाठी हे प्रकरण अडचणीचं ठरु शकतं असं म्हटलं जात आहे.
अर्पिताच्या घरातून केव्हा काय जप्त?
अर्पिता मुखर्जीच्या घरावरील पहिल्या छाप्यात ईडीनं २१.९० कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच ५६ लाखांचं परदेशी चलन आणि ७६ लाखांचं सोनं असं एकूण २३.२२ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यानंतर बुधवारी तपास एजन्सीनं २० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २ कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटं जप्त केली. या रक्कमेची ईडीचे अधिकारी अद्यापही मोजदाद करत आहेत. दोन्ही छाप्यांमध्ये मिळून अर्पिता मुखर्जीच्या घरांमधून ४५.२२ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अर्पिता मुखर्जीचं म्हणणं काय?
घरात मिळालेल्या घबाडाबाबत स्पष्टीकरण देताना अर्पिता मुखर्जीनं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, माझ्या काही कंपन्यांसंदर्भातील ही संपत्ती आहे. चौकशीदरम्यान, अर्पितानं कबूली दिली की, एक-दोन दिवसांत ती आपल्या घरातून रोख रक्कम इतरत्र हलवणार होती पण ईडीच्या छाप्यांमुळे तिची ही योजना फसली.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






