राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : मीराबाईची सुवर्णझळाळी!; विक्रमी वजनासह राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

Spread the love

वृत्तसंस्था, बर्मिगहॅम : भारताच्या मीराबाई चानूची विश्वातील सर्वोत्तम वेटलिफ्टिंगपटूंमध्ये गणना का केली जाते, याचा शनिवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला. मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील ४९ किलो वजनी गटात विक्रमी वजनासह सुवर्णपदकाची कमाई केली. हे तिचे राष्ट्रकुलमधील सलग दुसरे, तर भारताचे यंदाच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले.

गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या मीराबाईने आपला दबदबा कायम ठेवताना शनिवारी स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो असे एकूण २०१ किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केले. तिने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तिन्ही विभागांमधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचे विक्रम आपल्या नावे केले.

टीम झुंजार