दौंडला कटारिया महाविद्यालयातर्फे प्रभातफेरीद्वारे जनजागृती! पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा

Spread the love

दौंड । प्रतिनिधी (रवी देसाई) :- दौंड येथे कटारिया महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयाच्यावतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी जनजागृती प्रभातफेरी काढून करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी घर घर झेंडा, हर घर तिरंगा, वंदे मातरम्‌ या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला होता. दौंडच्या मुख्य चौकातून या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या प्रभातफेरीची सांगता दौंड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.

यावेळी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगेसाहेब यांनी सांगितले की, आपला राष्ट्रध्वज फडकविताना काय काळजी घ्यावी, जेणेकरून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही. तसेच राष्ट्रध्वज उतरवताना तो सन्मानपूर्वक उतावावा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून तो फाटणार नाही, याची काळजी घ्यावी, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तद्‌नंतर पोलीस बांधवांना विद्यार्थीनींच्यावतीने राख्या बांधण्यात आल्या.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. शरद गाडेकर यांनी केले तर प्रा. नीलेश साखरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार