झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- शहरात नगरपालिकेच्यावतीने शासनाच्या विविध योजनांतून पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण आणि मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन उद्या (ता.१५) आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नगर पालिकेच्यावतीने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहती व गांधीपुरा भागात नवीन नऊ उद्यानांचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.तसेच गट क्रमांक ८४० मधील स्मशानभूमीचे नूतनीकरण व कासोदा दरवाजा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या “माझी वसुंधरा” चौकाचे देखील उदघाटन करण्यात येणार आहे.




दलित वस्ती योजने अंतर्गत मरिमाता चौक परिसरातील स्मशानभूमी व आठवडे बाजार येथे बसविण्यात येणा-या इलेक्ट्रिक सोलर विद्युतीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच सुशोभीकरण करण्यात आलेल्या आठवडे बाजार चौकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.प्रभाग क्रमांक तीन मधील के.एम.महाजन यांच्या घरापासून ते दर्ग्यापर्यंत बसविण्यात येणा-या पेव्हर ब्लॉक कामांचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.




नगर पालिकेने शासनाच्या विविध योजनांतून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.






