दौंड :(रवी देसाई ) गणपती बाप्पा म्हटलं की थोरामोठ्यांपासून ते अगदी बालगोपाळांपर्यंत सर्वांच्या उत्साहाला उधाण येतं. अगदी काही दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन येऊन ठेपले आहे. यासाठी तालुक्यातील गणेश मूर्ती घडविणाऱ्या विविध कारखान्यांची गणेश मूर्तींवर अखेरचा हात देण्याचे कामकाज सुरू झाले आहे तर काही ठिकाणी बाप्पांच्या मूर्तींची विक्री आणि बुकिंगही सुरू झाले असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. यावेळी दौंड तालुक्यातील बेटवाडी परिसरातील सोमनाथ दिवटे यांचे मंगलमूर्ती आर्टस आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील किसन कुंभार यांचे श्री बोरमलनाथ क्लेआर्ट या गणपती बनविणाऱ्या कारखान्यांना आम्ही भेट देवून गणपती बनविण्याच्या प्रक्रिया आम्ही जाणून घेतल्या.
सोमनाथ दिवटे यांनी यावेळी विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती केली असून यावेळी गणेश मूर्तींना खरोखरचा फेटा, गळ्यातील उपरणे, पिंतांबर, धोतर, दागिने, गणेश मुकुटात बसविलेले आकर्षक खडे आणि सुंदर असे रेखीव कामकाज गणेश मूर्तींवर केलेले आपणांस पहायला मिळते. तसेच गेली दोन ते तीन वर्षांपासून दिवटे यांनी ‘मंगलमूर्ती गणेशा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला असून मागील वर्षी त्यांना या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर भाविक-भक्तांचा प्रतिसाद मिळाला होता. ‘मंगलमूर्ती गणेशा’ म्हणजे लाल मातीपासून गणेशाची मूर्ती साकारण्यात येते. सदरच्या मूर्तीची घरामध्ये दहा दिवस प्रतिष्ठापना झाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी गणपती नदीत किंवा इतर ठिकाणी पाण्यात विसर्जित न करता तुम्हाला गणपतीच्या मूर्तीसोबत दिल्या जाणाऱ्या कुंडीत त्याचे विसर्जन करावे. गणपती विसर्जित होऊन विरघळल्यानंतर त्याच कुंडीत एखादे रोप लावावे.

जेणेकरून आपल्या गणपती बाप्पाबद्दलच्या भावना आपल्यासोबत राहून गणपती बाप्पा वृक्ष गणेश रुपाने आपल्यासोबत सदैव राहतील, अशी ही संकल्पना आहे. सोमनाथ दिवटे यांच्या मूर्तींना जिल्ह्यातून तसेच इतर जिल्ह्यातून देखील मागणी असल्याचे सोमनाथ दिवटे यांनी सांगितले. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला येथे असलेले श्री बोरलमनाथ क्ले आर्टच्या गणेश मूर्ती घडविणाऱ्या कारखान्यांला भेट दिली असता या ठिकाणी देखील गणपती मूर्ती रंगविण्याचे कामकाज सुरू होते.

श्री बोरमलनाथ क्लेआर्टचे मालक किसन ज्ञानदेव कुंभार यांनी गणेशमूर्ती घडविण्याचा कारखान्याला साधारणत: 7 वर्ष झाली. साधारणत: जानेवारीमध्ये गणेश मूर्ती घडविण्यास सुरुवात होऊ लागते. प्रथम गणपतींचे साचे काढले जातात. त्यानंतर त्यांना इतर हात, सोंड जोडून मूर्तीला पूर्ण घडविण्यात येते. मग त्याच्यावर प्राथमिक रंगरंगोटी करून मूर्त रूप देतात. कान, नाक, डोळे, पितांबर, उपरणे, मुकुट, डोळे अशांवर रंगरंगोटी केली जाते. कोराना काळानंतर यावर्षी मूर्तींना मागणी वाढली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मात्र मूर्तीसाठी लागणारी साधनसामग्री ही महाग झाली असल्या कारणाने मूर्ती थोडी महाग विकावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कारखान्यांमध्ये 6 इंचांपासून ते 5 फुटांच्या गणेश मूर्ती साकारल्या जातात. पंचक्रोशीतील विविध गावांतील मंडळं आणि घरगुती गणपती बसविणारे भाविक-भक्त या ठिकाणाहून गणेश मूर्ती नेतात. या ठिकाणी काही ग्राहक देखील या ठिकाणी गणपती विक्री करण्यासाठी नेत असतात. त्यात विशेष अशी काही वाढ झालेली पहायला मिळत नाही. मात्र कोरोनानंतर हळूहळू गणेश उत्सव पूर्वपदावर येत असल्याचे एकंदरीत जाणवल






