प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वकष्टाने व्यवसायात गरुड झेप घेणारे कै.कुशलदादा तिवारी यांची सामाजिक बांधिलकी जपणारे आणि गोरगरिबांचे,अनाथ बालकांचे आधारस्तंभ अशी ओळख निर्माण झाली होती.गरजवंताना सढळ हाताने मदत करणारे कै.कुशल तिवारी कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले.कै.कुशल तिवारी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून आत्मविश्वासाने व्यवसायात यश प्राप्त केले होते.माध्यमिक शिक्षण घेत असतांना कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने त्यांनी लहानपणापासूनच वाहन चालवणे,रिक्षा चालवणे यासारखे कामे करण्यास सुरुवात केली होती.
रिक्षाचालक ते यशस्वी उद्योजक अशी स्वकर्तृत्वावर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.गोरगरिबांना आर्थिक मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम कै.कुशल दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या कै.कुशल दादांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या दिवशीच अचानक जगाचा निरोप घेतला.कै.कुशलदादांनी ज्या दिवशी जगाचा निरोप घेतला त्यादिवशी सकाळी आपल्या जवळच्या मित्रांशी मोबाईलवरून संपर्क साधून मी कोरोनावर मात केली असे बोलून आनंद व्यक्त केला होता,मात्र नियतीला ते मान्य नव्हते आणि काही क्षणातच काळाने त्यांचा परिवार,मित्रपरिवार यांना शोकसागरात बुडवले.

कै.कुशलदादा तिवारी यांची आर्थिक परीस्थिती अत्यंत बेताची होती.वडील किरण तिवारी पिठाची गिरणी चालवून आणि शेतीचे कामे करून परिवाराचा चरितार्थ चालवत होते.कै.कुशलदादा यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.त्यानंतर स्वत:चा खासगी व्यवसाय व उद्योग सुरु करण्याचा मानस त्यांनी केला आणि त्यामध्ये यशस्वी देखील आले.व्यवसाय आणि उद्योगात याशावी झाल्यानंतर त्यांनी समाजातील गोरगरीब,वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

खडके बुद्रुक (ता.एरंडोल) येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलांची परीस्थिती पाहून अत्यंत भावनिक झालेल्या कुशल दादांनी स्वत:चा वाढदिवस अनाथ बालकांसोबत साजरा करून त्यांना विविध प्रकारचे सहकार्य केले.अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना कुशलदादा अत्यंत भावनिक होत असत.अनाथ मुलाना तुम्ही अनाथ नाहीत तर सर्व समाज तुमच्याबरोबर आहे असा संदेश ते देत असता.कोरोनाच्या संकटात तालुक्यातील सुमारे पाच हजार गोरगरीब नागरिकांना त्यांनी जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्याना आधार देण्याचा प्रयत्न केला.ग्रामीण भागातील येणा-या नागरिकांना पिण्याचे थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ठिकठीकाणी स्वखर्चाने थंड पाण्याचे मशीन बसवले आहेत.तीन वर्षापूर्वी कुशलदादा तिवारी यांनी आपली मुलगी कै.धनश्री हिच्या स्मरणार्थ शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थिनींना उच्च दर्जाच्या हजारो वह्यांचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या कुशल दादांनी हजारो नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केल्यानंतर देखील त्याची कधीही वाच्यता केली नाही.

कै.दादांच्या निधनानंतर वैद्यकीय व शैक्षणिक मदत केलेले नागरिक स्वत:हून केलेल्या मदतीची माहिती देऊन लहान मुलासारखे,आपल्या परिवारातील सदस्यांप्रमाणे ढसढसा रडत होते.कै.कुशल तिवारी यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यासाठी त्यांचे वडील किरण तिवारी,लहान बंधू राहुल तिवारी,विशाल तिवारी आणि परिवारातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य करीत होते.आजही त्यांचे बंधू राहुल तिवारी आणि विशाल तिवारी कै.कुशल दादांनी सुरु केलेल्या सामाजिक व धार्मिक कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत.

कोरोनाच्या संकटात हजारो नागरिकांना मदतीचा हात देणा-या कै.कुशलदादांना दोन वर्षापूर्वी काळाने हिरावून घेतले.कै.कुशल दादांच्या अचानक झालेल्या निधनामुळे गोरगरीब नागरिक,अनाथ बालके,त्यांच्याकडे असलेले कामगार यांचेसह सामाजिक,राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला.कै.कुशल दादांचे निधन झाल्यानंतर सोशल मिडीयावर नागरिकांनी टाकलेल्या श्रद्धांजलीतील मजकुरच त्यांच्या कार्याची पावती देणारे होते.अनाथ आश्रमातील मुलांसाठी पालक बनलेले कुशल तिवारी यांच्या निधनामुळे अनाथ बालके आम्ही पुना पोरके झालो आहोत अशी भावना व्यक्त करीत होते.
समाजातील शेवटच्या घटकाला मदत करण्याचा त्यांनी कायम विचारच केला नाही तर तो प्रत्यक्ष अंमलात देखील आणला.सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रीय सहभागी होणारे,गरजवंतांना साधाल हाताने मदत करणारे,गरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करून त्याना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे,गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आर्थिक मदत करणा-या कै.कुशलदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.






