अंगारकी चतुर्थी निमित्ताने 82 हजार भाविकांनी घेतले गणरायाचे दर्शन, अमोल दादा पाटील यांच्या हस्ते झाली महापूजा-

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-
देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतले.पहाटे पाच वाजता पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्याहस्ते महापूजा व आरती करण्यात आली.साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र पदामालाय येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.राज्य परिवहन महामंडळाकडून एरंडोल, जळगाव,पाचोरा येथून पद्मालय येथे जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.

पहाटे पाच वाजता जिल्हा बँकेचे संचालक अमोल जाधव यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली.यावेळी पद्मालय देवस्थानच्यावतीने संचालक अमोल पाटील यांचा माजी सभापती आनंदराव पाटील,ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कोळी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव यांचेसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मालय येथील समस्या सोडवून भाविकांसाठी जास्तीत जास्त सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती अमोल पाटील यांनी सांगितले.

सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या लाब रांगा लागल्या होत्या.श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी भिमकुंड परिसरात जाऊन नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटला.भाविक आणि लहान बालकांनी दर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटला.सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पद्मालय परिसरातील घनदाट अरण्यात सर्वत्र हिरवेगार चित्र निर्माण झाले होते.मंदिर परिसरात असलेले मोर पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.तसेच अनेक भाविकांना वन्यप्राण्यांचे देखील दर्शन झाले.

मंदिरासमोरील तलावात असलेली विविध रंगांची कमळाची फुले भाविकांचे लक्ष भेदून घेत होते.एरंडोल,पाचोरा,म्हसावद परिसरातील असंख्य भाविक पायी दर्शनासाठी आले होते.यामध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता.अंगारकी चतुर्थीमुळे भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे उपाहारगृह चालक,पूजेचे साहित्य विक्री करणारे विक्रेते यासारख्या लहान व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली उलाढाल झाली.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

चौकट
सकाळी पाच वाजता मंदिराचे कपाट उघडून भाविकांसाठी खुले करण्यात आले होते उशिरा रात्रीपर्यंत भाविकांच्या दर्शनाची गर्दी सुरू होती दिवसभरात 82 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचा अंदाज आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व रिंगणगाव, कासोदा, तळई प्राथमिक आरोग्य केंद्र व नाशिक येथील डॉक्टर कोल्हे यांनी आरोग्य सेवा दिली.

अनेक दात्यांनी दिली सेवा
विशाल प्रकाश पाटील पारोळा यांनी5 क्विंटल साबुदाणा खिचडी,व केळीचे वाटप केले, ज्ञानेश्वर पाथरवट यांनी भाविकांसाठी चहा चे वाटप केले, नितीन पाटील शाखा अभियंता बांधकाम विभाग यांचेकडून केळीचे वाटप करण्यात आले यांचेसह अनेक भक्तांनी पिण्याचे पाणी, साबुदाणा खिचडी, केळी,चहा यांचे वाटप करण्यात आले.

चोख बंदोबस्त
पद्मालय गालापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश पवार यांनी आपला कर्मचाऱ्यांसह परिसर स्वच्छ केला होता. एसटी महामंडळातर्फे सुरळीत बस सेवा पुरवण्यात आली. काही अपरिहार्य घटना घडू नये म्हणून एरंडोल नगरपालिकेतर्फे अग्निशामक दलाचा बंब सह कर्मचारी उपस्थित होते

टीम झुंजार