जालना :- येथील भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळं खळबळ उडाली आहे. प्रल्हादपूरमध्ये एका शेतकऱ्याने मक्याच्या शेतीत चक्क (Ganja trees) गांजाची रोपे लावली. या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना (Police) खबर मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने शेतात जाऊन छापा टाकला. पोलिसांनी अंदाजे १ लाख रुपये किमतीच्या २१ किलो गांजाची रोपे जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपी हा शेतमालक असून दगदूबा धोंडूबा खेकाळे असं त्यांचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर येथील मक्याच्या शेतात अवैधरित्या गांजा लागवड केल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, विभागीय पोलीस अधिकारी बहुरे यांच्या पथकांनी प्रल्हादपूर गावातील गट क्रमांक ५१ मध्ये छापा टाकला.
यावेळी शेताच्या बांधावर असलेल्या गवतात गांजाची रोपे लावलेली पोलिसांना आढळली. पोलिसांनी ही रोपे नष्ट करून शेतमालक दगदूबा धोंडूबा खेकाळेला अटक केली. आरोपी विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.