दारू पिऊन रेल्वेत महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन आमदारांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

भोपाळ :- दोन काँग्रेस आमदारांविरोधात महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवांचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेने आज (शुक्रवार) दोन काँग्रेस आमदारांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. दोन्ही आमदार दारूच्या नशेत होते, असेही पीडितेने सांगितले आहे. याशिवाय रेल्वेमधील प्रवाशांनी देखील आमदार नशेत होते आणि अभद्र भाषा वापरून प्रवाशांना त्रास देत होते, असे सांगितले आहे.

रीवा वरून हबीबगंज येथे जाणाऱ्या रेवांचल एक्स्प्रेसमध्ये आपल्या मुलासह प्रवास करत असलेल्या महिलेने आमदारांकडून होत असलेल्या छेडछेडाबाबत पतीला फोनद्वारे माहिती दिली. जनरल रेल्वे पोलीसचे प्रभारी पीके अहिरवार यांनी सांगितले की, महिलेच्या पतीने ट्वीटकरून रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस त्या रेल्वेत गेले आणि त्यांनी महिलेची मदत केली. याप्रकरणी सतना येथील काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाहा आणि कोतमा येथील आमदार सुनील सराफ यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

काँग्रेस आमदारांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगितले एफआयार दाखल झाल्यानंतर काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाह यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. “महिला मुलासोबत प्रवास करत असल्याने मी तिला अतिशय नम्रतेने माझी जागा बसण्यास देऊ केली. तर सुनील सराफ यांनी त्या महिलेस सौजन्य म्हणून जेवणही दिले. मला नाही माहीत त्या महिलेला काय चुकीचे वाटले आणि तिने तक्रार दाखल केली.

तर आमदार सुनील सराफ म्हणाले की, रेल्वेत अन्य लोकही होते मात्र कोणीही काही म्हटले नाही. ती आमच्या जागेवर झोपलेली होती. दरवाज्यातून येणाऱ्या आवाजामुळे तिचे बाळ जागं झोपेतून उठत होतं, त्यामुळे ती दुसऱ्या ठिकाणी गेली. यानंतर पोलीस जेव्हा आले तेव्हा आम्हाला आरोपाबाबत समजलं.
भाजपाने कमलनाथ यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले –
या घटनेवरून भाजपाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना स्पष्टीकरण मागितले आहे. भाजपाचे प्रवक्ते लोकेंद्र पाराशर यांनी या संपूर्ण प्रकारावर कमलनाथ यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे.

कमलनाथ यांनी आमदारांकडून मागितले उत्तर –
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर आमदार सिद्धार्थ कुशवाह आणि आमदार सुनील सराफ यांच्याकडून या प्रकरणाबाबत उत्तर मागितले आहे. शिवाय या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी कमलनाथ यांनी समितीही स्थापन केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार