उदयपूर:- पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी करवा चौथचं व्रत करतात. या संपूर्ण दिवसात पत्नी निर्जला व्रत करते आणि संध्याकाळी पूजा केल्यानंतर पतीच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडते. पण एकाच नवर्यासाठी दोन बायका मिळून करवा चौथ व्रत करत असतील तर?
एकत्र पाणी पिऊन सोडला उपवास
उदयपूरचे भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांना दोन पत्नी आहेत. दोघीही एकाच घरात एकत्र राहतात. अशा परिस्थितीत करवा चौथच्या निमित्ताने दोन्ही पत्नींनी एकत्र उपवास करत अर्जुनलाल मीणा यांची पूजा केली. त्यानंतर दोघींनी एकत्र पाणी पिऊन उपवास सोडला.
अनेक वर्षांपासून एकाच पतींसाठी दोन पत्नी करतात व्रत
खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी अनेक वर्षांपासून आपल्या पतींसाठी करवा चौथचं व्रत करतात. करवा चौथच्या निमित्ताने दोघींनी कथा ऐकली आणि चंद्र आल्यावर पती खासदार मीणा यांना पारंपारिक पद्धतीने टीळा लावून, मिठाई भरवत, आरती करुन दोघींनी एकत्रच चंद्र आणि मीणा यांना चाळणीतून पाहिलं.

‘दोन्ही पत्नींमुळेच बरा झालो’
अर्जुनलाल मीणा यांनी सांगितलं की, ते खूप दिवसांपासून आजारी होते, पण आता ते बरे आहेत. दोन्ही पत्नींच्या व्रतामुळेच बरे होऊ शकल्याचंही त्यांनी सांगितले. याआधी ते अनेक दिवस दिल्लीतील रुग्णालयात दाखल होते.

एक पत्नी सरकारी शाळेत शिक्षिका
खासदार अर्जुनलाल मीणा यांनी दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं आहे. मीणा यांनी सख्ख्या बहिणींशी लग्न केल्यामुळे या दोघींमध्ये दुरावा नाही. खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या एका पत्नीचं नाव राजकुमारी असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे.

दुसरी पत्नी गॅस एजन्सी मालक
या खासदाराच्या दुसऱ्या पत्नीचं नाव मीनाक्षी आहे. ती एका गॅस एजेन्सीची मालकीण आहे. या दोघी सख्ख्या बहिणी असल्याने त्या मागील कित्येक वर्षांपासून एकाच घरात आनंदाने राहत आहेत. आदिवासी भागात पुरुष एकाहून अधिक महिलांशी लग्न करू शकतात अशी परंपरा आहे.

अर्जुनलाल मीणा २०१४ मध्ये पहिल्यांदा झाले खासदार
अर्जुनलाल मीणा हे राजस्थानमधील २५ खासदारांपैकी एक आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उदयपूरच्या जनतेने मीणा यांना संसदेत निवडून दिलं.