Video:जीवदया! माणसाच्या अंत्यसंस्काराला आले माकड,नतमस्तक होऊन सर्वांसोबत लागले रडू

Spread the love

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करताना मानव आणि प्राण्यांमधील प्रेम दर्शवणारं हे आदर्श उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.
प्राणी आणि माणसांमधील नात्यावर भाष्य करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमधून मुक्या प्राण्यांप्रती प्रेम दाखवणाऱ्या व्यक्तीवर प्राणी कशाप्रकारे जीव ओवाळून टाकतात हे अधोरेखित होत असल्याचं दिसत आहे.

प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींवर प्राणीही किती प्रेम करतात याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे असंही म्हटल जात आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड अंतयात्रेमध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे. या माकडाला नेहमी खायला देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी हे माकडही दाखल झाल्याचं व्हिडीओतून दिसतंय.

मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह घराच्या अंगणामध्ये ठेवलेला असतानाच हे माकड या मृतदेहाजवळ येऊ बसतं. या संपूर्ण व्हिडीओमध्ये हे माकड या मृत व्यक्तीच्या डोक्यावरुन हात फिरवताना दिसत आहे. अनेकदा हे माकड आपली मान झुकवून नतमस्तक झाल्याप्रमाणे कृती करत असल्याचंही दिसत आहे. शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ श्रीलंकेतील असल्याचा दावा कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

“माकड त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या अंतयात्रेमध्ये अभिवादन करताना. हा व्हिडीओ बत्ताईकालोअमधील आहे,” असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हजारोंच्या संख्येने या व्हिडीओला व्ह्यूज आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करताना मानव आणि प्राण्यांमधील प्रेम दर्शवणारं हे आदर्श उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.

अनेकांनी मरण पावलेली व्यक्ती फारच प्रेम असणार त्यामुळेच त्याच्या निधनाने हे माकडही व्याकूळ झाल्याचं दिसत आहे, असं म्हटलंय. हे माकड या व्यक्तीच्या मृतदेहावर टाकलेले चादर आणि हार हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्नही करतानाही दिसत आहे. बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पाहून आपण भावूक झालो असून आपल्याला अश्रू अनावर झाल्याचंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

टीम झुंजार