अण्णांच्या आठवणींना दिला उजाळा..

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
जंक्शन :- ( ता.इंदापूर )
अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था,महाराष्ट्र राज्यचे हितचिंतक,आमचे स्नेही व संस्था सोलापूर जिल्हा मा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीकांत लोहार नंदेश्वर यांचे वडील स्वर्गिय पांडुरंग लोहार (आण्णा) यांचे दि 30।10।2022 रोजी दुःखद निधन झाले आहे.


आण्णाच्या कार्याबद्दल.
आधुनिक काळामध्ये विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध अवजारे विकसित होताना दिसतात परंतु अनेक वर्षे पिढीजात चालत आलेला परंपरागत लोहारकीचा व्यवसाय टिकवून तो जोपासण्यामध्ये हातखंडा असलेला व तरूणाईला हि लाजवेल इतक्या चपळाईने काम करणारा अंगावर पांढरा शुभ्र ३ बटणी शर्ट, पांढरी विजार, डोक्यावरती टोपी असा पेहराव असणारा ८० वर्षांचा नंदेश्वर गावचा पांडुरंग लोहार……
कर्नाटक सिमेभागावरील गावांमध्ये धान्य साठविण्याच्या कणगी,विहिरीतील पाणी काढण्याच्या मोटा इत्यादी अवजारे तयार करणारा कारागीर म्हणुन पांडुरंग लोहार या भागात खुप प्रसिद्ध आहे.

पांडुरंग लोहार यांचा जन्म स्वातंत्रपुर्व काळात लोहार कुटुंबात झाला. पांडुरंग लोहार यांचे वडील गावोगावी जाऊन उदरनिर्वाहासाठी बलुती पद्धतीवर कुऱ्हाडी,खुरपी,टिकाव,बेडगे इत्यादी शेतामध्ये लागणारी विविध प्रकारची अवजारे बनवून देण्याचा लोहारकीचा व्यवसाय करायचे .व पांडुरंग लोहार हि वडिलांसोबत मदतीला जायचे. पांडुरंग लोहार हे आई वडीलांना व्यवसायमध्ये मदत करित व लोहारकीचा व्यवसाय शिकत पांडुरंग लोहार यांनी ७ वी पर्यंत कसेबसे शिक्षणाचे धडे घेतले व सरकारी नोकरीची संधी आलेली असताना ती धुडकावून पिढीजात चालत आलेला परंपरागत लोहारकीचा व्यवसाय करण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधून पांडुरंग लोहार हे लोहारकीचा व्यवसाय जोमाने करु लागले….


पुर्वी विहिरीमधील पाणी काढण्यासाठी मोटा असायच्या मोटा बनविण्यासाठी लागणारे सळई ,लोखंडी पट्ट्या पत्रा रिबिट इत्यादी साहित्य सामुग्री या भागात उपलब्ध नव्हते ते साहित्य सोलापूर,सांगली, कोल्हापूर या भागातुन आणुन मोटा बनवुन विकायचे. ते काम बरीच वर्षे केले व त्यानंतर विहीरीमधील पाणी काढणाऱ्या मोटा काळाच्या पडद्याआड गेल्या व आधुनिकतेच्या काळात विहिरीमधील पाणी काढण्यासाठी केरोसीन वरील इंजिने आली व त्यामध्ये बिघाड झाला कि ते इंजिने दुरुस्त करण्याचे काम करु लागले. आणि तेही काम बरेच वर्ष केलं. व त्याहि बंद झाल्या.पण त्याच बरोबर ज्वारी,बाजरी,मका,गहू हरभरा इत्यादी धान्य साठविण्याचे कोठार असलेल्या कणगी बनविण्याच काम अवघ्या वयाच्या १६ ते १७ वर्षांपासून सुरु केल ते आजपर्यंत गेली कित्येक वर्ष कणगी बनविण्याच काम अगदी आनंदाने अविरतपणे करताना दिसुन येतात.कणगी बनविण्याच साहित्य कर्नाटक, सोलापूर, सांगली येथुन आणयचे आता जवळपासच्या बाजारपेठेमध्ये हे साहित्य सामुग्री उपलब्ध झाले आहे. त्या साहित्यातुन ते १०,१५,२० पोत्यांच्या कणगी या वयातही २ दिवसात अगदी सहजपणे बनवितात.पांडुरंग लोहार यांनी आजपर्यंत ५ ते ७ हजार कणगी बनविण्याच काम केलं आहे…. पांडुरंग लोहार यांना या भागात पांडुरंग अण्णा या नावाने ओळखल जात या पांडुरंग अण्णाच्या कलेबद्दल या भागातील नागरिक आजही आनंदाने कौतुक करतात.


परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक पैपाहुणे व बांधव भगिनीं मित्रपरिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहोत,परमेश्वर लोहार कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी शक्ती देवो,हीच ईश्वर चरणी प्रार्थना।।।

भावपूर्ण श्रद्धांजली

शोकाकुल

अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था,महाराष्ट्र राज्य
मुख्यकार्यकारणी, सर्व समविचारी संघटना,शाखा समित्या सदस्य पदाधिकारी,हितचिंतक व कार्यकर्ते, पत्रकार गजानन टिंगरे.

#

टीम झुंजार