झुंजार प्रतिनिधी । एरंडोल :- ऐन सोयाबीन, ज्वारी बाजरी काढणी, कापूस वेचणी वेळेतच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया गेला आहे त्यामुळे एरंडोल तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने एरंडोल तालुका ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा असे निवेदन तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले. आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की.
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाले आहेत यंदा खरिपाच्या हंगामात अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यता म्हणजे देशात सोयाबीन व कापसाच्या पिकास सर्वात जास्त फटका बसला आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा होती. परंतु सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे आणि विमा संदर्भातील दिरंगाई मुळे नाईलाजाने शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी काढली वेळ काढू धोरणामुळे शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहेत हेच या काळात अधोरेखित झाले आहे.
पूर्वी सरकारी अधिकारी पंचनामा करीत होते परंतु आता मोबाईल वरती फोटो काढून पाठवा. असे विमा कंपनी शेतकन्यांना कळवते यामध्ये शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येतात. सध्या विमा अधिकारी पाहणी करीत आहेत परंतु पीक काढून झालेल्या सोयाबीनच्या शेतीची पाहणी करून निष्कर्ष कसा काढणार? शिवाय काही ठिकाणी विमा अधिकारी पैसे मागतात अशा तक्रारी येत आहेत. विमा भरपाई मिळवणे हे अधिकच किचकट झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर रब्बी पेरणीसाठी काही पैसे शेतकरी हाताशी ठेवू शकतात नुसते ‘दुष्काळ सदृश परिस्थिती’ म्हटल्याने शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळत नाही. आप सरकार दिल्ली देते त्याप्रमाणे
सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, ही मागणी सुद्धा रास्त आहे. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन आम आदमी पार्टी जळगावचे जिल्हाध्यक्ष तुषार निकम, तालुका अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी केले आहे. या निवेदनावर उज्वलसिंग पाटील,चंद्रकांत महाजन,सोपान महाजन,मगणसिंग पाटील,आनंदा पाटील,विनायक देसले,अविनाश सोनवणे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षऱ्या आहेत
फोटो ओळ :- आप पार्टीच्यावतीने ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देतांना तुषार निकम नामदेवराव पाटील, उज्वलसिंग पाटील,अविनाश सोनवणे व इतर पदाधिकारी






