एरंडोलला तीस कोटी रुपयांच्या नवीन पा.पु. योजनेस मंजुरी.-आ. चिमणराव पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार भूमिपूजन.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी। एरंडोल- एरंडोल शहरासाठी सुमारे तीस कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराश सर्व नवीन वसाहतींमध्ये स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात पाणीपुरवठा करणा-या जलवाहिन्या अत्यंत खराब झाल्या असल्यामुळे अनेक भागात दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.

तसेच अनेक नवीन वसाहती व आदिवासी वस्त्यांमध्ये जलवाहिन्या नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.आमदार चिमणराव पाटील यांनी शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेवून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरु केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार चिमणराव पाटील यांनी भेट घेवून शहरातील पाण्याच्या समस्येबाबत माहिती देऊन नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे आवाहन केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेवून संबंधित अधिका-यांना सुचना करून पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्याचे आदेश दिले.

नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक अमृत-२०२२/प्र.क्र.२६८/नवी-३३ अंतर्गत २ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये अमरु-२.०.अभियान अंतर्गत नगरपालिकेच्या २९ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मंजुरी देण्यात आली.पारोळा शहरासाठी देखील सुमारे ५३ कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून एरंडोल आणि पारोळा या दोन्ही शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.नवीन पाणी पुरवठा योजनांमुळे एरंडोल आणि पारोळा शहरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार असून नागरिकाना शुध्द व मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये विशेषत: नवीन वसाहतींमधील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेत चार नवीन जलकुंभ आणि ८० किलोमीटर पाईपलाईन- मुख्याधिकारी विकास नवाळे.

शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत चार जलकुंभ आणि ८० किलोमीटर पाईपलाईन असल्याची माहिती पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली.शहराची २०५४ या वर्षापर्यंत होणारी लोकसंख्या लक्षात घेवून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.या योजनेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र नियोजित असून त्याद्वारे दररोज तीन दशलक्ष क्युबिक लिटर शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.सदरची पाणीपुरवठा योजना संपूर्ण सोलरवर असून त्यासाठी २६५ किलो vhat सोलर सिस्टीम बसविण्यात येणार आहे त्यामुळे पाणीपुरवठा योजनेवरील विजेचा खर्च शून्य राहणार आहे.शहरासह पालिका हद्दीतील समावेश करण्यात आलेल्या सर्व नवीन वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे.तसेच ओम नगर,पालिका कार्यालयाजवळ आणि श्रीराम कॉलनी याठिकाणी नवीन मोठे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.तर पद्मालय रस्त्यावरील उत्तमनगर या आदिवासी वस्तीतील रहिवाशांसाठी लहान जलकुंभाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.

टीम झुंजार