धक्कादायक : बायकोसोबत सतत वाद, तरुणाने कंटाळून कोब्राला केलं किस अन् अनर्थ घडला…

Spread the love

नाशिक : – सापासोबत स्टंट करतानाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशा जीवघेण्या स्टंटबाजीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सर्पमित्राने मात्र वेगळ्याच कारणासाठी अशी स्टंटबाजी केली आहे. सर्पमित्राने पत्नीच्या त्रासाला कंटाळून पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर शहरातील एका महाविद्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्पमित्र नागेश श्रीधर भालेराव याने पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापासोबत स्टंट केला. यावेळी सापाने त्याच्या ओठांना दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नी सोबत पटत नसल्याने कौटुंबिक वाद होत होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी नागेशने एक व्हिडिओ क्लिप बनवत जीवाचे बरे वाईट करेल असे म्हटले होते. यानंतर त्याने पकडलेल्या कोब्रा सापासोबत स्टंट करताना चुंबन घेताना सापाने त्याला दंश केला यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ एकच उडाली आहे.

काही दिवसांपासून पत्नी सोबत वाद झाल्याने तो घराबाहेर राहत होता. दोघांचा वाद एवढा टोकाला गेला होता की नागेश ने दोन दिवसांपूर्वी स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे त्याने म्हटले होते. पत्नीकडून त्याला वेळोवेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात येत असल्याने तो कंटाळून घर सोडून गेल्याचे त्याने व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. नागेश हा गेल्या काही वर्षांपासून सर्प पकडण्याचे काम करत होता तो परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित झाला होता.

सिन्नर शहरातील वेल्डिंग वर्कशॉप सह होर्डिंग चिटकवण्याचे काम करून नागेश कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नागेशने तयार केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्टॅम्प पेपरवर विवाहात फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. पत्नीकडून नागेश व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने स्टॅम्प पेपर वर नमूद केले होते.

दरम्यान, नागेश ने काही दिवसांपूर्वी पकडलेल्या कोब्रा सापाला सिन्नर महाविद्यालयाच्या समोरील कॅफेत आणले या कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागेशने नागासोबत स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी नागेशने कोब्रा सापाला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला व यातच सापाने नागेशच्या ओठांना एकदा व गालावर दोनदा दंश केला यात नागेशला त्याचा जीव गमवावा लागला. याबद्दलची माहिती नागेशच्या मित्रांना कळताच त्यांनी नागेशला दवाखान्यात दाखल केले परंतु उपचाराअगोदरच नागेशने त्याचे प्राण गमावले होते. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा पसरली असून नागेशने जीवाचे बरे वाईट करेल असे व्हिडिओ क्लिप बनवल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा जीव गेला आहे. त्यामुळे परिसारत एकच खळबळ उडाली आहे.

सापासोबत स्टंटबाजी नडली!

नागेश हा काही वर्षांपासून सर्प पकडण्याचे काम करत होता. मात्र, आजवर त्याला कुठल्याही प्रकारचा दुखापत झाली नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला असल्याने त्याने घर सोडण्याचाही निर्णय घेतला होता. या प्रकरणी पत्नीकडून तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्याने मोबाईलवर स्वत:चा व्हिडीओ बनवत बेपत्ता नसून इथेच असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच पत्नीच्या त्रासाला कंटाळलो असल्याने आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्याने व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटले होते. तर दुसरीकडे त्याने नागाला पकडून त्याच्यासोबत स्टंट करताना सापासोबत स्टंट करताना त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

हे वाचलंत का ?

टीम झुंजार