जन्मठेपेच्या शिक्षेतून दोन महिलांची निर्दोष मुक्तता.

Spread the love

एरंडोल-खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोन महिला आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली.याबाबत माहिती अशी,की अडावद (ता.चोपडा) येथे १९ मे २०१६ रोजी गणेश खंबायत यांच्या लग्नानिमित्त संगीताचा कार्यक्रम सुरु होता.यावेळी नाचण्याच्या कारणावरून तुकाराम काशिनाथ खंबायत व त्यांची पत्नी रेखाबाई तुकाराम खंबायत यांच्यात वाद झाला.पती व पत्नी यांच्यातील वाद वाढतच गेल्यामुळे दोन्ही जण भांडतच घरात गेले.त्यावेळी रेखाबाई खंबायत यांच्या आई सुशीलाबाई अरुण बर्डे या देखील घरात गेल्या.

थोड्याच वेळात रेखाबाई खंबायत आणि त्यांच्या आई सुशीलाबाई बर्डे या घरातून वाचवा,वाचवा अशा आरोळ्या मारल्यामुळे गणेश खंबायत यांनी घरात जाऊन वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.मात्र तुकराम खंबायत यांना गणेश खंबायत हा घरात आल्याचा राग आल्यामुळे त्याने गणेश खंबायत यांच्यावर चाकूने हल्ला करू जखमी केले.चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे गणेश खंबायत यांचा मृत्यू झाला.याबाबत मयत गणेश खंबायत यांचे भाऊ हिरालाल खंबायत यांच्या तक्रारीवरून तुकाराम खंबायत,रेखाबाई खंबायत आणि सुशीलाबाई बर्डे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सरकारी पक्षातर्फे न्यायालयात असे सानाग्न्यात आले की,घटनेतील संशयित तुकाराम खंबायत यांच्या पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती गणेश खंबायत यांना असल्यामुळे तिघाही आरोपींनी कटकारस्थान रचून मयत गणेश खंबायत यास घरी बोलावून त्याचा खून केला.सदर खटल्यात गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने तुकाराम खंबायत, रेखाबाई खंबायत आणि सुशीलाबाई बर्डे यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात तिघाही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले.सदर प्रकरणात आरोपींतर्फे तक्रारदार हीरालाल खंबायत आणि प्रत्यक्षदर्शी किशोर यांची साखा आरोपींना सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाही.दोघांच्याही पुरवणी जबाब आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १६४ खाली दिलेल्या जबाबात सुसंगता आढळून येत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

तसेच तक्रारदार हिरालाल खंबायत यांनी दोन्ही महिलांना गोवण्यासाठी सुधारणा करीत पुरवणी जबाब दिला आहे.त्यामे दोन्ही महिला आरोपींचा दोष केवळ संशयापलीकडे सिद्ध होत नाही.तसेच सदर प्रकरणात कटकारस्थान रचल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.तसेच तक्रारदार हे मयत गणेश खंबायत यांचे नातेवाईक असून घटनेच्या वेळी तटस्थ व्यक्ती हजर असून देखील सरकारी पक्षातर्फे त्यांना तपासण्यात आले नाही.सदर प्रकरणात निकाल देतांना न्यायमूर्ती आर.जी.अवचट आणि न्यायमूर्ती आर.एम.जोशी यांच्या खंडपीठाने आरोपींचे युक्तिवाद मान्य करून सदरच्या प्रकरणात फिर्यादीची साक्ष आणि फिर्याद यात सुसंगता आढळून येत नाही.फिर्यादीने पुरवणी जबाब देतांना मूळ फिर्यादीत दुरुस्ती करून दोघा महिलांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच कटकारस्थान रचल्याचा कोणताही पुरावा आढळून येत नसल्यामुळे न्यायालयाने मुख्य आरोपी तुकाराम खंबायत यांची शिक्षा कायम ठेवून रेखाबाई खंबायत आणि सुशीलाबाई बर्डे यांची निर्दोष मुक्तता केली.सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अँड. दिपेश पांडे यांनी काम पाहिले.

हे पण वाचा

टीम झुंजार