विहिरीतून ओरडण्याचा आवाज येतोय, पोलिसांना एक फोन अन् अनंताचा जीव वाचवण्याचा थरार

Spread the love

बुलडाणा: अनेक वेळा आपण म्हणतो की पोलिसांप्रमाणे पोहोचू नका. साधारणत: एखादी घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर पोहोचतात. पण, बुलडाणा जिल्ह्यातील या घटनेमध्ये पोलीस अगदी वेळेवर पोहोचल्यामुळे एका इसमाला जीवदान मिळाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनमधील अंमलदार हे नेहमीचे कामकाज करत होते. त्यावेळी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन बोराखेडीचे ठोणदार बळीराम गिते यांना फोनवर माहिती मिळाली की सब स्टेशन मोताळा समोरील विहिरीतून एका माणसाचा ओरडण्याचा आवाज येत आहे, पोलिसांची मदत पाहिजे. मिळालेल्या माहितीवरुन पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांनी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक विकास पाटील, यशवंत तायडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिनंदन शिंदे, शरद खर्चे यांना तात्काळ घटनास्थळी सरकारी रवाना केले. पोलीस निरीक्षक गिते यांनी सांगितल्या प्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विहीरीत पाहिले.

तेव्हा त्यांना विहिरीमध्ये एक इसम दोरीच्या सहाय्याने पाण्यात उभा दिसला. तेव्हा पोलिसांनी खाजगी इसम शिवाजीराव देशमुख, योगेश देशमुख दोन्ही रा. मोताळा तसेच वासुदेव खर्चे रा. आडविहीर यांचे मदीतीने पोलिसांनी सदर विहीरीतील पाण्यात पडलेल्या व्यक्तीला विहिरीबाहेर काढलं. तेव्हा विहिरीत पडलेल्या इसमास पोलिसांनी नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनंत जयसिंग गायकवाड (वय ५३ वर्ष, रा. केशव नगर बुलडाणा) असे सांगितले. तेव्हा त्यांच्या हाताला आणि पायाला जखम असल्याने पोलीसांनी त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे नेले.

उपचार करुन त्यांच्यावर विचारपूस केली असता त्या व्यक्तीने सांगितले की, सेवागीर बाबा आश्रम मोताळा येथे जात असतांना लघु शंकेसाठी रोडच्या बाजुला गेला. तेव्हा माझ्या पायाला ठोकर लागुन माझा तोल जाऊन मी विहिरीत पडलो. तेव्हा पोलिसांनी मला विहिरी बाहेर काढून माझे प्राण वाचवले, असे सांगुन त्यांनी पोलिसांचे आभार मानले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचं कौतुक होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार