मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज भारतीय संसदेत अर्थसंकल्प सादर होत असताना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने २-१ या फरकाने जिंकली आणि क्रीडा क्षेत्राला सुमारे ३३९७ कोटी रूपयांची तरतूद का केली याचे उत्तर अवघ्या देशाला मिळाले. अगदी काही तासांपूर्वी १९ वर्षांखालील टी२० महिला क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतीय संघाने जिंकला. तसेच विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडू उच्च दर्जाची कामगिरी करत आहेत. खेळाडूंना चांगले मार्गदर्शक, पौष्टिक आहार, विविध सोयीसुविधांनी सुसज्ज क्रीडांगण, वातावरण मिळावं यासाठीच केंद्रीय अर्थसंकल्पात ही भरीव तरतूद करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात न्यूझीलंडवर १६८ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका २-१ अशी जिंकली. विजयासाठी २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १२.१ षटकांत अवघ्या ६६ धावांत संपुष्टात आला. डेरेल मिचेलची (२५ चेंडूंत ३५) एकाकी झुंज अपयशी ठरली. भारताकडून हार्दिक पंड्याने १६ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, शिवम मावी, उमरान मलिक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविल्या. सलामीवीर शुभमन गिलने (६३ चेंडूंत नाबाद १२६) मुळे भारताला मोठा विजय मिळाला.
विजयासाठी निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर फिन अॅलन (४ चेंडूंत ३) हा हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवच्या हाती झेल देत बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर डेव्हन कॉन्वेला (२ चेंडूंत १) अर्शदीप सिंगने पंड्याच्या सहाय्याने बाद केले. याच षटकात अर्शदीप सिंगने मार्क चॅपमनला भोपळाही फोडू दिला नाही. ईशान किशनने त्याचा झेल टिपला. ग्लेन फिलिप्सला (७ चेंडूंत २) मग पंड्याने यादवच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. डेरेल मिचेल आणि मायकेल ब्रेसवेल यांच्यावर डाव सावरत अपेक्षित धावगती वाढविण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली. परंतु ब्रेसवेल (८ चेंडूंत ८) पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उमरान मलिकच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अवघ्या २१ धावांत निम्मा संघ गारद झाला. मिचेल सँटनरला (१३ चेंडूंत १३) कर्णधाराला साजेशी खेळी करण्यात अपयश आले. नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शिवम मावीच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल यादवने टिपला. याच षटकांत शिवम मावीने ईश सोधीला भोपळाही फोडू न देता परत पाठविले. पंड्यानेही फर्ग्युसनला शून्यावर परत पाठविले. ब्लेअर टिकनेर (१ चेंडूंत १) टिकू शकला नाही. डेरेल मिचेल (२५ चेंडूंत ३५) तेराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि भारताने सामना जिंकला. बेंजामिन लिस्टर (१ चेंडूंत १) नाबाद राहिला.
त्याआधी, कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ईशान किशन दुसऱ्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर अवघी एक धाव करून बाद झाला. मायकेल ब्रेसवेलने त्याला पायचीत केले. ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवऐवजी राहुल त्रिपाठीला पॉवरप्लेचा फायदा उचलण्यासाठी बढती देऊन तिसन्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्यात आले. बढती मिळालेल्या त्रिपाठीने चार चौकार आणि तीन षटकार लगावत २२ चेंडूंत ४४ धावा झोडपल्या. धावगती आणखी वाढविण्याच्या नादात ईश सोधीच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात उडालेला त्याचा झेल लॉकी फर्ग्युसनने टिपला. त्रिपाठीचे अर्धशतक अवघ्या सहा धावांनी हुकले. ब्लेअर टिकनेरने सूर्यकुमारला (१३ चेंडूंत २४) ब्रेसवेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या (१७ चेंडूंत ३०) शेवटच्या विसाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. डेरेल मिचेलने त्याला ब्रेसवेलमार्फत झेलबाद केले.
शुभमन गिलला (नावाद १२६) सामनावीर तर हार्दिक पंड्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. गिलचे टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतले पहिले शतक ठरले. त्याने केवळ ५४ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मा हे दोघेही ३५ चेंडूंत शतक झळकावून संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. श्रीलंका, न्यूझीलंड नंतर भारत ऑस्ट्रेलियावरही भारी पडणार का याचं उत्तर तर मिळेलच पण त्याआधी आजचा विजय तर साजरा करायलाच हवा.