पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षा

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर

मतदान केंद्रावर दारूच्या नशेत हुज्जत घालणाऱ्याला मज्जाव करण्यास गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अमळनेर जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर असे की,२१ ऑक्टोबर २०१९ रोजी हातेड बु ता.चोपडा येथील जिप च्या शाळेत मतदान सुरू होते.त्याठिकाणी आरोपी शरद खंडू रोकडे हा दारूच्या नशेत मतदान करण्यासाठी आला.परंतु त्याच्याकडे मतदान कार्ड नसल्याने त्यास मतदान अधिकारी यांनी मतदान कार्ड घेऊन ये व मतदान कर असे सांगितले.

मात्र तो तेथील अधिकाऱ्यांशी हुज्जत घालू लागला.व फोन लावून बायको व इतर नागरिकांना बोलावून घेतल्याने वाद वाढले होते.मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्याठिकानी नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिवाजी खोपडे यांना वाद मिटविण्यासाठी सांगितले.त्यावेळी आरोपीने वाद मिटविण्यासाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल रमेश खोपडे यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करू लागला व त्यांच्या गणवेशाची ओढाताण करून कॉलर पकडली.याबाबत चोपडा ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले होते.

सदरील खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते.त्यात फिर्यादी रमेश खोपडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल लोणे यांची साक्ष महत्वाची ठरली.सदर खटल्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप अराक व तत्कालीन उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी केला.जिल्हा न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपीस शासकीय कामात अडथडा निर्माण करणे, मतदान केंद्र व शासकीय कर्मचाऱ्यांशी बेशिस्त वागणूक केल्याने पाच वर्षांची शिक्षा व ५०० रुपये दंड,दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली.सदर खटल्यात सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी भादवी कलम ३५३ मधील कलमात महाराष्ट्र राज्यापूर्ती नवीन दुरुस्तीचा आधार घेऊन प्रभावी युक्तिवाद केल्याने आरोपीस पाच वर्षांची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील व उदयसिंग साळुंखे, हरीश तेली चोपडा यांनी काम पाहिले.

हे पण वाचा

टीम झुंजार