पोलीस पाटलांनी गावातील गुन्हेगारीचा कचरा साफ करायला हवा- पोलीस निरीक्षक विजय शिंदे,पोलीस पाटील दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर

पोलीस पाटील हे पद पोलीस ठाणे ,महसूल विभागासाठी महत्वाचा घटक असून ,गावातील एकोपा , शांतता भंग होऊ नये , सर्व सण उत्सव शांतपणे राष्ट्रीय एकात्मतेतून साजरे करणासाठी गालबोट लावणाऱ्या प्रवृत्ती , गुन्हेगारी निपटून काढण्यासाठी , गुन्हेगारीचा साफ करण्यासाठी पोलीस पाटलांनी कार्य करावे असे प्रतिपादन पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केले ते पाडळसरे येथून जवळच असलेल्या मारवड येथील स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराच्या सभागृहात , महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे पोलीस पाटील दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यातते बोलत होते ,यावेळी अमळनेर , चोपडा , पारोळा तालुक्यातील महिला व पुरुष पोलीस पाटील यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने ,पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक चौधरी, जिल्हा सचिव हर्षल पाटील, जिल्हा संघटक रमेश पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्ष प्रमोद पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष गोविंदा शिंदे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील , डॉ. विलास पाटील, प्रा हिरालाल पाटील ,बाबूलाल पाटील आदी उपस्थित होते.

पो. नि. शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गुन्हेगारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, यासाठी गावातील घडणाऱ्या चुकीच्या घटनांना वेळीच अटकाव करणे हे पोलीस पाटलांचे आद्य कर्तव्य आहे. आज प्रत्येक गावात तरुण मुले सहज उपलब्ध म्हणून दारुच्या आहारी गेले आहेत, त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटलाने गावातील गुन्हेगारीचा कचरा साफ करायला हवा. आज पोलीस आपल्या कामगिरीने दबंग तसेच सिंघम म्हणून ओळखले जातात, दबंग, सिंघम आपल्यातही आहेत. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. प्रत्येक पोलीस पाटलाने निडरपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे. अमळनेर तालुका पू. सानेगुरुजी, संत सखाराम महाराज यांसारख्या महान व्यक्तिंच्या विचारांनी ओळखला जातो.

त्यामुळे आपण आपले कर्तव्य बजावून या महान व्यक्तिंच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे. गावात राहून राजकारणाची खेळी करू नका, चुकीच्या गोष्टी जागेवरच ठेचून काढा, असेही आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पोलीस पाटलांना केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनीही आपल्या मनोगतात प्रत्येक पोलीस पाटलांनी कायद्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, कायद्याचा अभ्यास असल्यास आपणास कर्तव्य बजावताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमात लोणपंचम, जैतपीर, डांगरी, पिंगळवाडे, अंतुर्ली, पाडळसरे, झाडी, सबगव्हाण, चौबारी, अमळगाव, हिंगोणा, दरेगाव, खर्दे आदी गावातील पोलीस पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रवींद्र मोरे यांनी केले तर आभार भाऊसाहेब पाटील यांनी मानले.

हे पण वाचा

टीम झुंजार