राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा बबन कांबळे यांच्या आदरांजली सभेत एरंडोलकरांचा निर्धार

Spread the love

एरंडोल :- दिनांक दोन व तीन एप्रिल रोजी तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. या संमेलना संदर्भात व्यापक प्रबोधन जिल्हा व राज्यभर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ, राज्य समन्वय समिती अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांमार्फत सातत्याने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून एरंडोल तालुका समन्वय समितीची आज सभा श्रावस्ती पार्क एरंडोल या ठिकाणी संपन्न झाली. दैनिक सम्राट चे संपादक कालकथीत बबन कांबळे यांच्या निधनाबद्दल आदरांजली सभेचे सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आले होते. आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते शालिग्राम गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी संमेलनाविषयी भूमिका मांडताना सांगितले की दिनांक 3 एप्रिल रोजी जळगाव येथे होणारे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन हे ऐतिहासिक होणार असून आंबेडकरी चळवळीतल्या संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्यिक मोठ्या प्रमाणावर या समितीच्या तयारीसाठी कामाला लागलेले आहेत. जिल्हा विभाग आणि तालुका पातळीवर आतापर्यंत 30 सभा या संमेलनासाठी घेण्यात आल्या आलेल्या आहेत आणि राज्यस्तरावर आठ सभा घेण्यात आलेल्या आहेत. राज्यभरातून 200 पेक्षा अधिक साहित्यिक या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅली करीता दहा गावांची निवड करण्यात आली आहे. त्या दहा गावांना सभा यशस्वीपणे संपन्न झालेल्या आहेत. एरंडोल तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सदर संमेलनासाठी यासाठी योगदान द्यावे असे आवाहन सुद्धा स्वागताध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले.


सभेचे प्रमुख मान्यवर मुकुंद भाऊ सपकाळे म्हणाले की या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी केली जात आहे. सत्यवादी साहित्यावर बंदी आणली जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये सत्याचा आवाज बुलंद करण्याचे काम करण्यासाठी बौद्ध साहित्याचे आयोजन महत्वपूर्ण ठरत आहे. हे साहित्य संमेलन मोठ्या सामर्थ्यांनीशी आम्ही यशस्वी करून दाखवू असे आश्वासन त्यांनी सभेला दिले. बौद्ध साहित्य हे अनेक अंगाने प्रदूषित करण्याचे प्रयत्न सातत्याने व्यवस्थेमार्फत सुरू आहेत. त्याला हाणून पाडून मूळ बौद्ध साहित्य जनतेसमोर आणणे काळाची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जळगाव येथील राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन आहे, असे प्रतिपादन जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ साहेब यांनी केले.


आपल्या अध्यक्षीय भाषणात शालिग्राम गायकवाड म्हणाले की या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनासाठी एरंडोल तालुका मोठ्या सामर्थ्यानिशी योगदान देणार आहे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष धनराज मोतीराय आण्णा यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश तामस्वरे आण्णा यांनी केले. आभार प्रदर्शन डॉक्टर संदीप कोतकर यांनी केले.
सदर प्रसंगी प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांची तालुका समन्वय समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा संयोजन समिती करिता प्रवीण केदार सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार, प्रा. नरेंद्र तायडे, प्रमिलाताई तामस्वरे, ईश्वर बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच जिल्हा धम्मजागृती रॅली समितीमध्ये निवड झाल्याबद्दल मायाताई खैरनार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. समन्वय समितीतील गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी नितेश डोंगरे कार्यक्रमाला उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर शुभम जाधव व डॉक्टर भूषण जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मनोज नन्नवरे सर , दादाभाऊ शिरसाट, सागर बोडरे, निषू तामस्वरे यांची सभेला उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपाला दैनिक सम्राटचे संपादक बबन जी कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार