दुदैवी घटना! जोरदार वादळामुळे झाडाची फांदीचा डोक्याला मार लागून ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Spread the love

निंभोरा येथील तरुण शेतकऱ्यांचा वादळाने घेतला बळी.

प्रतिनिधी | अमळनेर

येथून जवळच असलेल्या निंभोरा परिसरात बुधवारी १५ मार्च रोजी संध्याकाळी अचानक जोरदार वादळ सुटल्याने येथील तरुण शेतकरी सागर संजय धनगर (वय ३३) आपल्या घरी जात असताना वादळाने अंगावर झाडाची फांदी पडल्याने जबर जखमी झाला त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अभ्यासू व उमदा शेतकऱ्यांचा अवकाळी वादळाने बळी घेतल्याने निंभोरा गावात शोककळा पसरून सर्व गाव शोकमग्न झाले . सागराची मृत्यूची वार्ता गावात येताच गावात स्मशान शांतता पसरली आहे

सविस्तर वृत्त असे की सागर उच्चशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर असून पुणे येथे एका नामांकित कंपनीत नोकरीवर होता पण गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे आपल्या निंभोरा या गावी शाश्वत शेती करत वडिलांना मदत करीत शेती फुलवित होता.शेतात गोल भेंडी, डांगर असे नगदी पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत होता. असेच यावर्षी शेतात त्याने चार एकर डांगर लावलेले आहे.याच डांगराची गाडी भरून सागर डांगर मोजण्यासाठी दोन दिवसाआड होतेड येथे जात असे. अशीच एक गाडी भरून काल दिनांक १५ रोजी दुपारी चार वाजेनंतर हातेड येथे गेला होता.

डांगर मोजून झाल्यावर घरी परत येत असताना संध्याकाळी अचानक जोरदार वादळ सुरू झाले.त्यावेळी अमळगावच्या पुढे अचानक अंगावर झाडाची वजनदार फांदी तुटून पडल्याने सागर जबर जखमी झाला असता
प्रथमोपचारासाठी अमळगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यास अमळगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करत प्रकृती चिंताजनक पाहून पुढील उपचारासाठी सागरला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले.

याबाबत आज दिनांक १६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविल्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले , पोलिसांत समाधान गोरख धनगर यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे , सागरच्या आकस्मित निधनाने निंभोरा गावावर शोककळा पसरली आहे. सागरच्या पश्चात त्याचे आई-वडील, पत्नी,मुलगा, भाऊ असा परिवार आहे. एका प्रगतिशील शेतकऱ्याचा वादळाने जीव घेतला प्रशासन याची भरपाई करेल का ? असा नागरिक प्रश्न विचारत आहेत. अभियंता असलेल्या सागरच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच गाव शोकमग्न झाले , अवकाळी वादळाने होतकरू तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूने गावात स्मशान शांतता पसरून हळहळ व्यक्त होत होती.

हे देखील वाचा

टीम झुंजार