बोदवड : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात एक घटना घडली आहे.
गेल्या वर्षी पत्नीने ज्या तारखेला आत्महत्या करुन जीवन संपवले होते, त्याच तारखेला वर्षभरानंतर पतीनेही पत्नीचा विरह तसेच अन्य काही कारणांमुळे मृत्यूला कवटाळून जगाचा निरोप घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. निलेश सुभाष माळी (वय ३५, रा. गोरक्षनगर, बोदवड) असं मृत तरुणाचं नाव आहे. निलेश माळी याने शहरातील वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे.
बोदवड शहरातील गोरक्षनगरात निलेश माळी हा कुटुंबासह वास्तव्यास होता. तो बोदवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दूध डेअरीचा व्यवसाय करत होता. गेल्या वर्षी १४ मार्च रोजी निलेश याच्या पत्नीने मूलबाळ होत नाही, यासह कौटुंबिक कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पती निलेश याच्यासह सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात निलेश यास अटकही झाली होती. तसेच याच गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी निलेश हा जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.
आधी नाश्ता केला, मग घेतली विहिरीत उडी
पत्नी आपल्याला सोडून गेली, तसेच पुन्हा १५ मार्च रोजी न्यायालयात सुनावणी यासह विविध कारणांमुळे निलेश हा कारागृहातून बाहेर आल्यापासून नैराश्यात होता. निलेश हा मंगळवारी रात्री घराबाहेर पडला. ज्या ठिकाणी निलेश दूध डेअरीचा व्यवसाय करत होता आणि शहरातील वर्दळीचा चौक तसेच बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात निलेश आला. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी एका नाश्त्याच्या गाडीवर निलेश याने नाश्ता केला. त्यानंतर त्याने याच चौकात वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या दिलीप गौरीशंकर अग्रवाल यांच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, निलेशने विहिरीत उडी घेतल्यानंतर अनेकांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळाल्यावर बोदवड पोलिसांनी घटनास्थळ गाठले, तसेच नागरिकांच्या मदतीने निशेलला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने शहरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निलेश यास मृत घोषित केले. याप्रकरणी निलेश याचे काका प्रकाश माळी यांच्या खबरीवरुन बोदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र गुरचळ हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






