कंटेनर व टॅकरच्या धडकेत दोन्ही वाहनांचे चालक ठार. कंटेनरमधील लाखो रुपयांची औषधी जळून खाक.

Spread the love

एरंडोल- भरधाव वेगाने औषधे घेऊन जाणा-या कंटेनरने समोरून येणा-या टॅकरला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांवरील चालक ठार झाले.अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे कंटेनर व त्यामधील असलेला औषधी जळून खाक झाली.एरंडोल पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.हा अपघात आज पहाते पाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महाम्रार्ग क्रमांक सहावर असलेल्या पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल नॅशनल पंजाब समोर झाला.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत माहिती अशी,कि आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिंपळकोठा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर धुळ्याकडून जळगाव कडे जात असलेल्या टॅकर क्रमांक एम,एच.३४ बीजी ९८३७ ला जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक एन.एल.०१ क्यू ७१५१ ने समोरून जोरदार धडक दिली.धडक दिल्यानंतर कंटेनरने पेट घेतला.तसेच अपघातात दोन्ही वाहनाचे चालक बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव गंभीर जखमी झाले.उपचार सुरु असतांना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला.पिंपळकोठा येथील लहू अभिमन्यू चव्हाण आणि राजेंद्र सुभाष बडगुजर हे सकाळी फिरण्यासाठी गेले असता त्यांना अपघात झाल्याचे व त्यातील एका वाहनाने पेट घेतल्याचे दिसून आले.त्यांनी वाहनांवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.तसेच एरंडोल पोलीस स्थानकास अपघाताची माहिती कळवली.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार काशिनाथ पाटील,अकिल मुजावर व त्यांचे सहकारी अपघातस्थळी दाखल झाले व त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व हॉटेलमधील कामगार यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून गंभीर जखमी झालेल्या चालकांना बाहेर काढले आणि एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले.उपचार सुरु असतांना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला.अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक कॅबीन पूर्णपणे जळून खाक झाली.तसेच कंटेनरमध्ये असलेल्या औषधी व खोक्यांनी पेट घेतला.

एरंडोल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे किरण पाटील व त्यांच्या सहका-यांनी सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये शासकीय रुग्णालयाची औषधी असल्याचे समजते.अपघात परिसरात सर्वत्र औषधी विखरून पडल्या होत्या. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,पो.हे काॅ अनिल पाटील,काशिनाथ पाटील,अकील मुजावर व त्यांच्या सहका-यांनी ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत केली.अपघातग्रस्त कंटेनरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली होती.याबाबत लहू चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार