इंदौर, मध्य प्रदेश : देशभरात रामनवमीचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी प्राचीन राम मंदिरांमध्ये श्रीराम जन्माचा उत्सव पार पडला.मध्य प्रदेशातील एका जुन्या मंदिरात याच प्रकारे जन्मोत्सव सुरु असताना भीषण घटना घडली. इंदौर (Indore) येथील एका जुन्या मंदिरात भाविक राम जन्मासाठी जमले होते. रामाच्या मूर्तीसमोर पूजा, आरतीसाठी लोक उभे होते. मात्र ते ज्या ठिकाणी उभे होते, तिथे एक प्राचीन विहिर होती. त्यावर सिमेंटचं अच्छादन होतं. २०-२५ जण त्यावर उभे असतानाच अचानक हे झाकण धसलं अन् हे लोक थेट विहिरीत कोसळले.
50 फूट खोल विहीर–
इंदौर येथील स्नेहनगर जवळील पटेल नगर परिसरातील राम मंदिरात ही भीषण घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात विहिरीवर टाकलेलं अच्छादन अचानक ढासळलं. ही विहीर ५० फूट खोल होती. राम नवमीच्या उत्सवासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. या विहिरीवर २० ते २५ जण उभे होते. अचानक हे झाकण ढासळल्याने सगळेच लोक थेट पाण्यात कोसळले. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु आहे.
10 वर्षांपूर्वीच विहिर झाकली…
राम जन्मोत्सवानिमित्त भाविक जमले असताना अशी घटना घडल्याने इंदौरमध्ये खळबळ माजली आहे. इंदौरचे खासदार लालवानी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. या विहिरीत पाणी असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरतंय. मंदिर परिसरात आता लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. १० वर्षांपूर्वीच विहिरीवर हे झाकण तयार करण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेत किती जण विहिरीत पडले, याचा निश्चित आकडा समोर आला नाही. मात्र आतापर्यंत ५-६ जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु असून बचावलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं जातंय.

हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






