नंदूरबार येथे दोन गटात प्रचंड राडा; तुफान दगडफेक, वाहने जाळली, 24 समाजकंटकांना घेतले पोलिसांनी ताब्यात.

Spread the love

नंदूरबार : जळगाव जिल्ह्यातील पाळधी, संभाजीनगर जिल्हात आणि मुंबईतील मालवणीमधील तणाव निवळलेला असतानाच आता नंदूरबारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर वाहने जाळली. त्यामुळे नंदुरबार येथे तणाव निर्माण झाला आहे. ज्या भागात राडा झाला त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. मात्र, नंदुरबार येथे झालेल्या राड्याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पोलीस या राड्याच्या कारणांचाही शोध घेत आहेत.

नंदूरबार येथे काल रात्री ही घटना घडली. शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी वाहने पेटवली. त्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. त्यामुळे दोन पोलीस जखमी झाले. मात्र, पोलिसांनी आपली कार्यवाही सुरूच ठेवत जमाव पांगवला आणि तणाव नियंत्रणात आणला. या दंगलीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या हाणामारीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते.

सोशल मीडियावर वॉच

नंदूरबारमधील दोन गटातील हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 24 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सायबर सेल सोशल मीडियावर वॉच ठेवून आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही अफवा पसरू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. मात्र, सध्या नंदूरबारमधील तणाव निवळला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दगडफेकीत सहा वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे. जमावाविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील व्यवहार सुरळीत सुरू असून अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी केले आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार