एरंडोल-विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे सर्व प्रभागात एक दिवस उशिराने पाणी पुरवठा करण्यात येईल असे नगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे,तर वीज पुरवठा नियमित सुरु असून पालिकेतर्फे वीज वितरण कंपनीबाबत नागरिकांना चुकीची माहिती देवून दिशाभूल केली जात असल्याचे वीज वितरण कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.नगरपालिका व वीज वितरण कंपनीच्या वादात शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन फिरावे लागत असून नगरपालिका व वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी योग्य समन्वय साधून शहरातील पाणीपुरवठा नियमित करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.सद्यस्थितीत तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे.शहरात पालिकेतर्फे तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता.मात्र नगरपालिकेतर्फे शहरात रिक्षाद्वारे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून अवकाळी वादळी वा-यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे तसेच वाढत्या तापमानामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे पुढील दोन महिने पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.नगरपालिकेने वीजवितरण कंपनीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे जाहीर सुचनेद्वारे नागरिकांना कळविल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी यावर आक्षेप घेतला असून महावितरण तर्फे वीजपुरवठा अखंडितपणे सुरु असून कोणत्याही प्रकारचे भारनियमन देखील करण्यात येत नसल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.
वीज पुरवठा बंद असल्याची कोणत्याही भागातून तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घेवून वीजपुरवठा सुरळीत केला जातो.नगरपालिकेतर्फे महावितरण कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.नगरपालिकेने पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे खापर वीजवितरण कंपनीवर फोडले असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.याबाबत कोणताही कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा महावितरण कंपनीने पत्राद्वारे दिला आहे.नगरपालिका आणि महावितरण कंपनी यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून वस्तुस्थिती नेमकी काय आहे याचा जाहीर खुलासा करण्याची मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा असतांना एक दिवस उशिरा पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.शहरात अनेक सार्वजनिक व खाजगी नळांना तोटया नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.तसेच शहरातील अनेक भागात पाणी आल्यानंतर पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत असून पालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.शहरात ज्या प्रभागात पाणीपुरवठा केला जातो त्या प्रभागात पालिका कर्मचा-यांनी फिरून पाण्याचा अपव्यय करणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नगरपालिका आणि वीज वितरण कंपनीच्या वादात शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






