मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएलच्या ५१व्या सामन्यात रविवारी (७ मे) पहिल्यांदाच दोन भाऊ एका सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरले. गुजरात टायटन्सचा हार्दिक पंड्या आणि लखनौ सुपरजायंट्सचा कृणाल पंड्या आमनेसामने आले. या सामन्यात हार्दिकने मोठ्या भावाचा पराभव करत विजय मिळवला. गुजरातने ५६ धावांनी मोठा विजय मिळवला. त्याने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.
लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कृणालचा हा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातने २० षटकांत २ बाद २२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावाच करू शकला.
गुजरातचे ११ सामन्यांत १६ गुण आहेत. गुजरातचा हा आठवा विजय आहे. त्यांना या मोसमात केवळ तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, लखनौचा ११ सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांना पाच विजय मिळाले आहेत. एका सामन्यात निकाल लागला नाही. लखनौचे ११ गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहे.
२२८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाची सुरुवात चांगली झाली. काइल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ८८ धावांची भागीदारी केली. मेयर्स ३२ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला.
त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. मेयर्स बाद झाल्यानंतर डी कॉक एका टोकाला उभा राहिला. दुसऱ्या टोकाला एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. डिकॉक १६व्या षटकात बाद झाला. त्याने ४१ चेंडूत ७० धावा केल्या. डिकॉकने सात चौकार आणि तीन षटकार मारले. लखनौच्या मधल्या फळीने या सामन्यात खराब कामगिरी केली. दीपक हुडा ११, मार्कस स्टोइनिस चार आणि निकोलस पूरन तीन धावा करून बाद झाले. अखेरच्या षटकात प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या आयुष बडोनीने काही प्रयत्न केले, पण तोपर्यंत सामना हाताबाहेर गेला होता. बडोनीने ११ चेंडूत २१ धावा केल्या. कर्णधार कृणाल पंड्या खातेही उघडू शकला नाही. रवी बिश्नोईने चार आणि स्वप्नील सिंगने दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. या मोसमात पुनरागमन करणाऱ्या मोहित शर्माने पुन्हा एकदा छाप पाडली. त्याने चार षटकात २९ धावा देऊन चार बळी घेतले. मोहितने काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी आणि कृणाल पांड्याला बाद केले. मोहम्मद शमी, नूर अहमद आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, गुजरातकडून शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली. गिलने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. वृद्धिमान साहाने ४३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. त्याने १० चौकार आणि चार षटकार मारले. डेव्हिड मिलरने १२ चेंडूत २१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार हार्दिक पंड्याने १५ चेंडूत २५ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. लखनौकडून मोहसीन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शुभमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हे देखील वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.