शहादा :- पोलिस ठाण्यात २०२२ च्या गुन्ह्यातील आरोपीला येथील न्यायालयात सोमवारी (ता. ८) दुपारच्या सत्रात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना आरोपीने हिसका देऊन पांढऱ्या रंगाचा स्कॉर्पिओ गाडीत बसून सिनेस्टाइल फरारी झाला.दरम्यान, संबंधित पोलिसांनी पाठलाग केला; परंतु डोंगरगाव रस्त्याच्या दिशेने सुसाट निघालेल्या स्कॉर्पिओने एका व्यक्तीस धडक देऊन फरारी झाली. या वेळी पोलिसांनी नाकाबंदी केली; परंतु आरोपी व संबंधित गाडी अद्यापही मिळून आली नाही.
शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०७/२२ कलम ३७९ मधील अटकेत असलेला आरोपी ओम प्रकाश ऊर्फ ओमाराम किसनराव जाट (वय २५) हा आरोपी राजस्थानमधील असून, सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.
राजस्थानमध्येही संबंधितावर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस शहादा पोलिसांनी पकडून आणले होते. त्याला तीन दिवसांपूर्वी शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी पुन्हा न्यायालयात संबंधित आरोपीला पोलिस ठाण्यातून बेड्या घालून हजर केले होते; परंतु विश्रांतीसाठी आरोपी बसला होता. या वेळी एका अनोळखी व्यक्तीने संबंधित आरोपीजवळ येऊन हितगुज केले.
नंतर नंबरप्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी न्यायालयाच्या आवारात आली. त्याच वेळी आरोपीने संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला हिसका देऊन स्कॉर्पिओ गाडीत प्रवेश केला. संबंधित गाडीच्या चालकाने गाडी डोंगरगाव रस्त्याच्या दिशेने भरधाव नेली.या वेळी शहरातील गोविंदनगर येथील रहिवासी निवृत्त शिक्षक सुरेश कांजी चौधरी ओम ॲक्सिडेंट हॉस्पिटललगत उभे असताना त्यांना स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले.
रस्त्यावरही भरधाव जात असताना अनेकांनी पाहिले. शहादा पोलिसांनी तत्काळ म्हसावद, दरा फाटा तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी केली; परंतु अद्याप पर्यंत आरोपी मिळून आला नाही.
सिनेस्टाइल घटना
पोलिस कस्टडीमधून पलायन केलेल्या आरोपीने चित्रपटातील एखाद्या दृश्याप्रमाणे पोलिसाला हिसका देऊन न्यायालयाच्या आवारातून पलायन केले. या वेळी सुसाट निघालेल्या गाडीच्या मागे क्षणाचाही विलंब न करता पोलिस कर्मचाऱ्याने धाव घेतली;परंतु गाडी एवढ्या सुसाट वेगाने सुटली की क्षणात नजरेआड झाली. संबंधित गाडी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ असून, गाडीला पुढे व मागे नंबरप्लेट नसल्याने गाडी कुणाची आहे हे मात्र समजू शकले नाही.