एरंडोल :- नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरासह सर्व नवीन वसाहतींमधील पाण्याची समस्या दूर होनार असून नागरिकांना पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.शहरासाठी सुमारे २९ कोटी रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरु असल्याचे सांगितले.शहराचा विस्तार झाल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती.शहरातील पाणी समस्या दूर व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री गुलाबराव पाटील,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यामुळे शहरातील विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरासह सर्व नवीन वसाहतींमध्ये पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होऊन पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार असल्याचे सांगितले.पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती दिली.
नवीन पाणी पुरवठा योजनेत म्हसावद रस्त्यावरील श्रीराम कॉलनी,धरणगाव रस्त्यावरील ओमनगर,पद्मालय फाट्याजवळ असलेल्या उत्तमनगरमधील अदिवासी वस्ती याठिकाणी नवीन पाण्याची टाकी बांधण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नावाले यांनी सांगितले.तसेच नगरपालिका कार्यालयाजवळ असलेली जुनी पाण्याची टाकी पाडण्यात येणार असून त्याठिकाणी नवीन टाकी बांधण्यात येणार असल्यामुळे शहरासह सर्व नवीन वसाहतींमध्ये वेळेवर आणि पुरेशा प्रमाणावर पाणी पुरवठा होण्यास मदत होईल.
शहरातील सन २०५० वर्षापर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून नवीन पाणीपुरवठा योजनेत नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात सर्व भागात तसेच नवीन वासातींमध्ये सर्वत्र नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.सद्यस्थितीत शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रा.चिकाटे यांनी पाण्याच्या समस्येबाबत माहिती दिली.
आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,माजी नगरसेवक जहिरोद्दिन शेख कासम,चिंतामण पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी,गुड्डू जोहरी,मयूर महाजन,गोविंदा बिर्ला,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता प्रियंका जैन,लेखापाल विक्रम घुगे,दीपक गोसावी यांचेसह पालिका कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.






