आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात कोल्‍हापुर बंदला हिंसक वळण,पोलिसांनी केला लाठीचार्ज,जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता, जमावबंदी लागू.

Spread the love

कोल्हापूर :- आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात आज बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणार्‍या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्‍यातच या ठिकाणी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्‍काबुक्‍की झाली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते याच्यामध्ये बाचाबाची झाली.

यादरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धापवळ झाली. दरम्‍यान महापालिका चौकात जमाव आणि पोलिस आमनेसामने आल्‍याने परिस्‍थिती स्‍फोटक बनली. यावेळी पोलिसांच्या लाठीचार्जमुळे धापवळीत चौकात चपलांचा खच पडला आहे. यावेळी वार्तांकन करण्यासाठी आलेल्‍या पत्रकारांनाही पोलिसांचा लाठीमार बसला. दरम्‍यान, श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांनाही या घटनेचा फटका बसला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या परिसरात जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः रस्त्यावर उतरून जमावाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने दीडशेहून अधिक वाहनांची तोडफोड केली आहे. शहरातील चौकाचौकात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

आक्षेपार्ह स्टेटस विरोधात ठिय्या आंदोलन, शहरात कडक पोलीस बंदोबस्त….
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या. पोस्ट व्हायरल करणार्‍यांच्या घरावर चाल करून प्रक्षुब्ध जमावाने सिद्धार्थनगर व दसरा चौक येथील प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. लक्ष्मीपुरीतील बाजारपेठ, दुकाने, स्टॉल तसेच सीपीआर चौक परिसरातील हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली.

शहरात दिवसभर प्रचंड तणाव होता. पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला केल्याने संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज बुधवारी (दि. 7) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित जमण्याचे आवाहन या संघटनांनी केले होते.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणार्‍या समाजकंटकांना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. सुमारे दीड हजाराहून अधिक प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर दिवसभर ठाण मांडून रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी सीपीआर चौक, दसरा चौक आणि लक्ष्मीपुरीसह विविध ठिकाणी घोषणाबाजी करून समाजकंटकांविरुद्ध कारवाईची मागणी केली.

संतप्त कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडल्याची बातमी शहरात पसरताच अन्य संघटनांचे कार्यकर्त्यांनी तिथे गर्दी केली होती. प्रक्षुब्ध जमावाने सदरबाजार येथील तरुणाच्या घरावर चाल करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुण घरी नसल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला.
त्यानंतर दुपारी दोनच्या सुमाराला हिंदुत्ववादी संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवणार्‍या तरुणाला तातडीने अटक करा अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जोरदार घोषणाबाजी करून समाजकंटकांचा निषेध करण्यात आला.

जिल्ह्यात बंदी आदेश लागू…..
शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश लागू केला. मंगळवार, दि. 6 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. दि. 19 जून रोजी रात्री बारापर्यंत या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

टीम झुंजार