मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंग्लंडविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने विजयी सुरुवात केली. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी दोन गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडने कांगारूंना विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला. दोघांनी नवव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया आता मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने आठ गड्यांच्या मोबदल्यात ३९३ धावा केल्यावर त्याने धाडसी निर्णय घेत डाव घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ ३८६ धावांवर बाद झाला. इंग्लंडला पहिल्या डावात सात धावांची आघाडी मिळाली. त्यांनी दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला एकूण २८१ धावांचे लक्ष दिले. शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रात कांगारू संघाने सामना जिंकला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. त्यावेळी उस्मान ख्वाजासोबत स्कॉट बोलंड नाबाद होता. कांगारू संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी १७४ धावा करायच्या होत्या. पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि खेळ सुरू होण्यास उशीर झाला. पंचांनी दिवसाची नियोजित ९० षटके ६७ षटकांवर कमी केली आणि ऑस्ट्रेलियाला ६७ षटकात १७४ धावा करायच्या होत्या. स्कॉट बोलंड हा पाचव्या दिवशी बाद झालेला पहिला फलंदाज ठरला. त्याला स्टुअर्ट ब्रॉडने बेअरस्टोच्या हाती झेल देण्यअ भाग पाडले. बोलंडने २० धावा केल्या. त्याच्यानंतर पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड १६ धावा करून मोईन अलीचा बळी ठरला. कॅमेरून ग्रीन २८ धावा करून रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर बेन स्टोक्सने उस्मान ख्वाजाला बाद करत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले. ख्वाजाने पहिल्या डावात शतक झळकावले होते. दुसऱ्या डावात त्याने ६५ धावा केल्या. ख्वाजानंतर अॅलेक्स २० धावा करून जो रूटचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या आठ विकेटवर २२७ धावा होती. त्यांना विजयासाठी ५४ धावा करायच्या होत्या. फक्त दोन विकेट्स शिल्लक असताना इंग्लंड जिंकेल असे वाटत होते. येथून कर्णधार पॅट कमिन्सने लियॉनसह डाव पुढे नेत संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सने 73 चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. नॅथन लायनने २८ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने तीन आणि ऑली रॉबिन्सनने दोन बळी घेतले. मोईन अली, जो रूट आणि बेन स्टोक्स यांना प्रत्येकी एक यश मिळाले. उस्मान ख्वाजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना २८ जूनपासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..