डॉक्टरने हसतखेळतं कुटुंब अवघ्या काही तासात संपविलं, बातमी वाचून तुमचेही मन हेलावून जाईल
पुणे :- जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या वरंवड गावात सोमवारी 20 जून रोजी हादरवून टाकणारी घटना घडली. एका पशुवैद्यकीय डाॅक्टरने स्वतःच्या 10 वर्षाचा मुलगा, 6 वर्षांची मुलगी आणि पत्नीचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याचं उघड झालं.एका सुखवस्तू कुटुंबात असलेल्या या डाॅक्टरने असं पाऊल का उचलले असावं याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
चौघांचं दिवेकर कुटुंब……
मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यांतील वरवंड गावात अतुल दिवेकर (वय 39) हे वेटरनरी डाॅक्टर होते.
वरवंडमध्ये चैताली पार्क इथे ते कुटुंबाबरोबर राहायचे. त्यांच्या पत्नीचं नाव पल्लवी दिवेकर (वय 35) होतं.
त्यांना 10 वर्षांचा अद्वैत दिवेकर हा मुलगा तर 6 वर्षांची वेदांतिका ही मुलगी होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे एक सुखवस्तू कुटुंब होतं. अतुल दिवेकर यांची प्रॅक्टीसही चांगली चालत होती.
सोमवारी काय घडलं?……
सोमवारी म्हणजे 20 जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून दिवेकर कुटुंबाकडून काही प्रतिसाद येत नव्हता. फोन किंवा दार ठोठावल्यावर काही उत्तर येत नव्हतं.त्यामुळे शेजारच्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल कळवलं. संध्याकाळी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा दिवेकर कुटुंबाच्या घराचं दार बंद होतं. दार तोडून पोलीस आत गेले तेव्हा तिथे धक्कादायक चित्र होतं. “मग दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडल्यावर बायकोचा मृतदेह हॉलमध्ये होता आणि त्याचा मृतदेह बेडरुममध्ये गळफास घेऊन लटकलेली दिसली.
बायकोचा दोरीने गळा आवळल्याचं दिसलं. जिथे त्याची डेड बॉडी होती तिथे बेडरुममध्ये बेडवर सुसाईड नोट होती होती. त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की, मुलांना कोणत्या विहिरीत टाकलेलं आहे. त्यानुसार विहीरीतलं पाणी काढून टीमने शोध मोहीम राबवली. तेव्हा मुलांचे मृतदेह सापडले,” अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.ज्या विहिरीमध्ये अद्वैत आणि वेदांतिका यांचे मृतदेह होते त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी होतं. त्यामुळे पाणी काढून मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
पोस्ट मार्टमसाठी मृतदेह पुण्यातील ससून हाॅस्पीटलमध्ये पाठवण्यात आलेले आहेत.
अतुल दिवेकरने टोकाचं पाऊल का उचललं?……
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून अतुल दिवेकर याने हे पाऊल उचलेलं असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
“नवरा बायकोचे छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद सुरु होते अशी माहिती मिळाली. प्राथमिकरित्या या कारणांमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं दिसतंय. ते एक सुखवस्तू कुटुंब होतं. ते जनावरांचे डॉक्टर होते. त्यांची प्रॅक्टीस व्यवस्थित सुरु होती,” अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
पोस्ट मार्टम रिपोर्टमधून अजून काही माहिती पुढे येते का, याची प्रतिक्षा आहे.