सेवानिवृत्तीच्या पुर्वीचा पगार काढण्यासाठी 4 लाख 69 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्याध्यापक, संस्थेचा उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Spread the love

नांदेड :- स्वेच्छानिवृत्त घेतल्यानंतर सेवानिवृत्तीच्या पुर्वीचा 24 महिन्यांचा पगार काढण्यासाठी 4 लाख 69 हजार 978 रूपयांच्या लाचेची मागणी करून पुर्वी 83 हजार 551 रूपये घेवून आज (दि. 3 जुलै 2023) 3 लाख 80 हजार रूपये घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापक आणि संस्थेच्या कोषाध्यक्षाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षाविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण भाऊराव वाघमारे 44, पद – मुख्याध्यापक, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड. रा. हुस्सा, ता. नायगाव, जि. नांदेड), अरविंद गंगाधर इंगळे (30, पद- कोषाध्यक्ष, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड) आणि बालाजी किशनराव बामणे पाटील (पद – उपाध्यक्ष, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड. राहणार इब्राहिमपूर , ता. देगलूर, जि. नांदेड) यांच्याविरूध्द नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची पत्नी ही कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड या शाळेत स्वयंपाकी म्हणून होती.त्यांनी दि. 31/07/2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून सेवानिवृत्ती पूर्वीचे 24 महिन्याचे पगार काढण्यासाठी यातील तक्रारदार व त्यांची पत्नी हे मुख्याध्यापक नारायण वाघमारे आणि उपाध्यक्ष बालाजी बागणे पाटील यांना भेटले असता, त्यांनी एकूण थकबाकी रक्कम तुमच्या बँक खात्यात पडल्यानंतर 45% रक्कम द्यावी लागेल असे सांगितले होते. त्यापैकी 8 % रक्कम 83,551/- रुपये हे थकबाकीचे बजेट मंजूर करण्यासाठी यापूर्वीच घेतली होती.

दिनांक 30/06/2023 रॊजी तक्रारदार यांचे पत्नीचे बँक खात्यात थकबाकी रक्कम जमा झाल्यानंतर
मुख्याध्यापक नारायण वाघमारे यांनी तक्रारदार यांना फोन करून तुमचे थकबाकी चे पैसे जमा झाले
ठरल्याप्रमाणे 45% रक्कम आणून द्या असे सांगितले होते. नमूद 45% रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड कडून लाच मागणी पडताळणी केली असता,

पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना वाघमारे आणि बामणे पाटील यांनी शासकीय पंचासमक्ष 45% रक्कम 4,69,978/- पैकी 8% रक्कम 83,551/- रुपये यापूर्वी दिलेले वजा करून 3,86,427/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3,80,000/- रूपये स्विकारण्याचे मान्य केले. सापळा कारवाई दरम्यान नारायण वाघमारे आणि अरविंद इंगळे यांनी तडजोडीअंती ठरलेले 3,80,000/- रूपये लाचेची रक्कम शासकीय पंचासमक्ष स्विकारली. यावरून आरोपी यांना ताब्यात घेतले.नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक राजेंद्र पाटील पोलिस निरीक्षक स्वप्नाली धुतराज पोलिस निरीक्षक राहुल पखाले महिला पोलिस हवालदार मेनका पवार, पोलिस अंमलदार अरशद खान, यशवंत दाबणवाड,चालक गजानन राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार